अजित पवारांना फडणवीसांनी ब्लॅकमेल केले, पण आता तेच संकटात; जयंत पाटील यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांचा दाखला देत त्यांनी हा दावा केला.

७० हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्याच्या फाईलवर दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून दिली, असे विधान अजित पवार यांनी नुकतेच केले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढवण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते, हे अजित पवारांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील म्हणाले, तुम्ही (फडणवीस) विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले. सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली आणि आर. आर. पाटील यांच्यावर आरोप करणारी फाईल त्यांना दाखवली. म्हणजे तेव्हापासून आमच्या पक्षातील अंतर्गत कलहाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू होते. अजित पवारांना ही फाईल दाखवून तब्बल १० वर्षे ब्लॅकमेल करण्यात आले. यावरून ते भाजपमध्ये जाण्यास का प्रवृत्त झाले हे स्पष्ट होते. अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आले हे आता स्पष्ट झाले आहे.

फडणवीसांची कार्यशैली उघड

अजित पवारांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली उघड झाली आहे. यामुळे ते स्वतःच मोठ्या संकटात सापडले आहेत. मला वाटते की ते (अजित पवार) स्वतः यामुळे घेरले गेले आहेत. पण त्यांनी असे विधान करून देवेंद्र फडणवीस यांना आणखी अडचणीत आणले. कारण, यातून फडणवीस यांची कार्यशैली तसेच गेल्या १० वर्षांतील त्यांच्यातील संबंधही उघड झाले आहेत. त्यांनी ती फाईल विरोधी पक्षनेत्यांना दाखवली असती तर मला समजले असते, पण ते (अजित पवार) त्यावेळी केवळ एक विरोधी पक्षाचे आमदार होते.

logo
marathi.freepressjournal.in