अजित पवार गटाला धक्का? दोन आजी-माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार गटाला धक्का? दोन आजी-माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने नजीकच्या भविष्यात शरद पवार यांच्या पक्षाकडे आजी-माजी आमदारांचा ओघ वाढणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके हेही शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यापूर्वी सोलापूरमधील राजन पाटील यांनीही पवारांची भेट घेतल्याने सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

दिलीप वळसे-पाटलांबाबतही चर्चा

त्यातच आता दिलीप वळसे-पाटील हेही शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र वळसे-पाटील यांनी हे वृत्त निराधार आणि खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. आपण सध्या मतदारसंघात दौऱ्यावर आहोत. दिवसभर बैठका आणि सभांना हजर राहात आहोत, असे वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी आता वळसे-पाटील यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे वळसे-पाटील यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जाते.

logo
marathi.freepressjournal.in