मनातील ओठावर, नंतर पुन्हा पोटात; ‘मुख्यमंत्री’ शब्दावरून अजित पवारांचे घूमजाव

‘मनात जे असते, तेच ओठावर येते’ असे म्हणतात. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणारे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा पुन्हा एकदा उघड झाली.
मनातील ओठावर, नंतर पुन्हा पोटात; ‘मुख्यमंत्री’ शब्दावरून अजित पवारांचे घूमजाव
Published on

मुंबई : ‘मनात जे असते, तेच ओठावर येते’ असे म्हणतात. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणारे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा पुन्हा एकदा उघड झाली. ‘उपमुख्यमंत्री अनेकदा झालो, पण मुख्यमंत्री होता आले नाही’, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

‘गौरवशाली महाराष्ट्र’ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी ही इच्छा व्यक्त केली. मात्र, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आणि अजित पवार यांनी शब्द मागे घेत असल्याचे स्पष्ट केले व ज्यांच्याबरोबर १४५ आमदार तो मुख्यमंत्री होतो, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.

मुख्यमंत्रीपदापासून आतापर्यंत वंचित राहिलेले अजित पवार यांनी ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक अशी सर्वच बाजूने त्यांच्या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्यानंतर अजित पवारांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले. मुख्यमंत्रीपदाबद्दलचे वक्तव्य मागे घेऊन अजित पवारांनी तूर्तास या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, १४५ आमदार ज्यांच्या पाठीमागे तो मुख्यमंत्री होतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी “मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही,” अशी खंत व्यक्त केली.

ज्याच्यासोबत १४५ आमदार असतील, तर तो मुख्यमंत्री

मी तसे गमतीत म्हटले होते. मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो. मी माझे शब्द मागे घेतल्यावर आता त्यासंबंधीचा प्रश्नच उरत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी १४५ आमदार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदेंना पाठिंबा होता. त्याआधी उद्धव ठाकरेंना आमदारांच्या बहुमताचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे १४५ आमदार सोबत असतील तर तोच मुख्यमंत्री होतो, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

logo
marathi.freepressjournal.in