राजकारणातला लाडका 'दादा', शब्दाला पक्का असलेला नेता, पहाटेच उठून कामाला लागणारा माणूस, कोणत्याही फाइलवर त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असलेली व्यक्ती, प्रशासनावर मजबूत पकड असलेलं नेतृत्व, रोखठोकपणा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेल्या वादळी व्यक्तिमत्त्वाची आज बारामतीच्या मातीत अखेर झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज (दि.२९) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुपारी १२:१५ च्या सुमारास अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. मुखाग्नी देताच दादांच्या अखेरच्या दर्शनासाठी बारामतीत लोटलेल्या प्रचंड मोठ्या जनसागराने 'परत या, परत या, अजितदादा परत या', 'अजित पवार अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
बंदुकीच्या फैरी झाडून, बिगुल वाजवून मानवंदना
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच भीषण अपघात झाला. महाराष्ट्र पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत आणि बिगुल वाजवत अजित पवारांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते, अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘दादा’माणूस गमावला
अजितदादांच्या निधनामुळे केवळ भाजप-नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारमध्येच पोकळी निर्माण झाली नाही, तर त्यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दादांच्या अकस्मात जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ‘दादा’माणूस गमावला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या.