पैसा, बळ, भीतीचा वापर करून पळवापळवीचे राजकारण सुरू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

सर्वच पक्षांमध्ये वैचारिक बांधिलकीचा हळूहळू ऱ्हास होत आहे. राजकीय पक्ष आपली मूलभूत तत्त्वे सोडून रणनीतीच्या नावाखाली नेत्यांची पळवापळवी व दबावाचे राजकारण करत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
अजित पवार (संग्रहित छायाचित्र )
अजित पवार (संग्रहित छायाचित्र )ANI
Published on

पुणे : सर्वच पक्षांमध्ये वैचारिक बांधिलकीचा हळूहळू ऱ्हास होत आहे. राजकीय पक्ष आपली मूलभूत तत्त्वे सोडून रणनीतीच्या नावाखाली नेत्यांची पळवापळवी व दबावाचे राजकारण करत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.

‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सध्या ‘सुडाचे राजकारण’ वाढीस लागले असून, पक्षाचे संख्याबळ वाढवण्यासाठी आमिषे आणि दबाव यांचा खुलेआम वापर होत आहे. अलीकडे राजकीय पक्षांनी जवळपास आपापल्या विचारसरणींचा त्याग केला आहे. नेते कुठेही जात असून मनाला येईल ते करत आहेत,’ असे पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काही नेत्यांना आमिषे दाखवून पक्षांतरासाठी प्रवृत्त केले जाते, तर काहींवर प्रलंबित चौकशींचा धाक दाखवला जातो आणि पक्ष बदलल्यानंतर तपास यंत्रणांना शांत करून दिले जाईल, असे आश्वासन दिले जाते, असा आरोप पवार यांनी केला. राजकारणात पैसा आणि बळाचाच उघड वापर सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ज्यांच्याकडे पैसा आणि बळ आहे, ते त्याचा वापर करत आहेत. ज्यांना वाटते की जातीय मुद्दे उकरून काढून मते मिळवता येतील, ते तीच पद्धत अवलंबत आहेत, असे पवार यांनी वारंवार होणाऱ्या पक्षांतराबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आता उमेदवाराचे मूल्यमापन त्याच्या कार्यावर नाही, तर त्याच्या संभाव्य निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेवर केले जाते. उमेदवारांची लोकप्रियता मोजण्यासाठी सर्वेक्षणांचा वापर करण्याची नवी पद्धत रूढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एखाद्या भागात सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार कोण आहे, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. तो उमेदवार विरोधी पक्षात असल्यास त्याला किंवा तिला पळवून आणण्याचे प्रयत्न केले जातात, असे ते म्हणाले.

‘१९९२ ते २०१७ या काळात सूक्ष्म नियोजनातून पिंपरी-चिंचवडचा विकास झाला. सक्षम आर्थिक व्यवस्थापन आणि सक्षम नेतृत्वामुळे ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका ठरली. आमच्या काळात कर्ज घेण्याची किंवा रोखे काढण्याची गरजच भासली नाही,' असा दावा त्यांनी केला. मात्र भाजपच्या अखेरच्या कार्यकाळात रोखे काढण्यात आले, तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प, स्वच्छता मोहिमा आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या आठ-नऊ वर्षांत सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च झाले. प्रशासकीय खर्च, जो जवळपास ३०-३५ टक्के आहे, तो सुमारे २० हजार कोटी रुपयांचा आहे. ४० हजार कोटी रुपयांची विकासकामे अपेक्षित होती, पण ती प्रत्यक्षात दिसत नाहीत, असे पवार म्हणाले.

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत रस्त्यांची अवस्था खराब असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. ‘आमच्या काळात पवना धरणातून औद्योगिक नगरीत पाणी आणले गेले. दुर्दैवाने स्थानिक नेतृत्वाकडे वाढत्या औद्योगिक शहराचे नियोजन करण्याची दूरदृष्टी नव्हती आणि आज पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक समस्यांना तोंड देत आहे,’ असे ते म्हणाले.

कचरा व्यवस्थापन विभागात कागदावर दाखवलेली कर्मचारी संख्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संख्या जुळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “१२,३०० पेक्षा जास्त कर्मचारी दाखवले आहेत, पण त्यातील ५० टक्क्यांहून अधिक प्रत्यक्षात काम करत नाहीत,” असे सांगत पुणे आणि पीसीएमसीमध्ये ‘टँकर माफिया’ मुक्तपणे कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्ता असूनही भाजपवर टीका का करता, या प्रश्नावर पवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नागरी प्रश्नांवर लढवल्या जातात. राष्ट्रीय आणि राज्य निवडणुका वेगळ्या असतात. देश आणि राज्य कुणाकडे सोपवायचे, हे मतदारांना माहीत असते. महापालिका निवडणुका स्थानिक समस्यांवर असतात आणि आम्ही पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहोत, असे ते म्हणाले.

आपले काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शप)सोबत विलीनीकरणाच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत सांगितले की, अशा चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहेत. ‘सध्या आमचे लक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या काळात भ्रष्टाचार

स्थानिक भाजप नेत्यांच्या ‘दूरदृष्टीच्या अभावामुळे’ गेल्या आठ-नऊ वर्षांत प्रचंड खर्च होऊनही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. १९९२ ते २०१७ या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नियोजनबद्ध विकास झाला. मात्र २०१७ ते २०२२ या भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापन झाले, असा आरोप पवार यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in