पुणे : या आधी बारामतीमध्ये फक्त शेवटची सभा व्हायची, आता यांना का फिरावं लागतंय? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उपस्थित केला. दरम्यान, मी सध्या खूप तोलूनमापून बोलतोय, जर तोंड उघडलं तर यांना फिरायचं अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवार मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची, आता का फिरावं लागतं आहे? आता हे का करावं लागतं आहे? प्रशासनावर माझी पकड नाही का? मी फुले, शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो आहे. हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचं असेल तर भावनिक होऊ नका. घड्याळाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन त्यांनी केले. मी आजही तोलूनमापून बोलतो आहे. जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही. असा इशारा देत अजित पवार म्हणाले की, "काहीजण म्हणतात, त्यांना धमकावले जात आहे. मी कशाला धमकावू? आज अनेक जण म्हणतात, आज मी पक्ष चोरला. आज ८० टक्के आमदार माझ्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाल, ते बरोबर कसे? मी कुणालाही अडचणीत आणणार नाही.
केंद्राचा पैसा आणण्यासाठी मला बारामतीची खासदारकी पाहिजे
मला १९९० साली विद्या प्रतिष्ठानमध्ये विश्वस्त केलं. ७१ ते ९० पर्यत फक्त एक शाळा झाली, प्रतिष्ठानची एकही शाखा नव्हती. मी विद्या प्रतिष्ठान येथे आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतले. साहेब म्हणाले की विद्यार्थी मिळणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यार्थी मिळाले नाहीत, पण मी चिकाटी सोडली नाही. मी इमारती बांधल्या आणि आता काही हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यावेळी केंद्राचा पैसा नव्हता. मला केंद्राचा पैसा आणण्यासाठी खासदारकी पाहिजे. केंद्राचा पैसा आणून मला बारामतीचा विकास करायचा आहे. बारामतीची एमआयडीसी १९८८ ला सुरू झाली, त्याचे काम ९० ला सुरू झालं. आज त्यासाठी जागा कमी पडत आहे. नमो रोजगार मेळावा केला आणि त्यात १० हजार नोकऱ्या दिल्या. काही जणांनी त्यावर टीका केली. पण त्यांनी एक हजार नोकऱ्या तरी कधी दिल्या आहेत का? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
आताच्या खासदारांची ९० टक्के कामं मीच केली
अजित पवार म्हणाले की, "जे तुम्ही सांगितले ते मी आजपर्यंत केलं. काही लोकांचं काम मला कळत नाही. आताच्या खासदारांनी पत्रक काढले, पण त्यातील ९० टक्के कामं मीच केलेली आहेत. पोलीस उपमुख्यालाय, नगरपालिका, पोलीस ठाणे, पंचायत समिती, रस्ते ही कामं मीच केली. मी कऱ्हा नदीवरचे सगळे बंधारे नवीन करायला सांगितले आहेत. नाझरे धरणात पाणी आणण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे. केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आपला उमेदवार निवडून आला तर माझी ही कामे करा असे मी मोदींना सांगेन.
मोदी आपली कामे करतील
राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र कुणी नसतो. मोदींनी सांगितले की परत जेव्हा ते पंतप्रधान होतील त्यावेळी पहिल्या दोन महिन्यांत असे निर्णय घेतील की सगळे आश्चर्यचकित व्हाल. गेल्या १० वर्षात केंद्रातील आपले एकही काम झालं नाही. मी २ तारखेला सरकारमध्ये गेलो आणि अमित शहा यांनी सांगितले की हे काम करून द्या. आता १० हजार कोटींचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माफ केला.
आज महाराष्ट्रातील अनेक कारखाने कर्ज काढून भाव देतात. त्यामुळे कारखाने अडचणीत येतात. आधी कारखान्यचे बिल निघाल्याशिवाय लोकांची दिवाळी होत नव्हती, आता काय परिस्थिती आहे? असा सवालही अजित पवारांनी विचारला.