अजित पवारांचे ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू, व्हिडीओद्वारे केली ‘मन की बात’

उपमुख्यमंत्री अजित पवार हे धास्तावले असून गुरुवारपासून त्यांनी ‘डॅमेज कंट्रोल’चे आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे.
अजित पवारांचे ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू, व्हिडीओद्वारे केली ‘मन की बात’
Published on

रोहित चंदावरकर

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) काही आमदार प्रथम महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार आणि त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे धास्तावले असून गुरुवारपासून त्यांनी ‘डॅमेज कंट्रोल’चे आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’प्रमाणे अजित पवार हे समाजमाध्यमावरून एका दुर्मीळ व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट करीत असल्याचे पाहून अजित पवार यांचे समर्थकही चक्रावून गेले आहेत.

अजित पवार हे सहसा माध्यमांपासून दूर राहतात अशी त्यांची ओळख आहे, मात्र गुरुवारी त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरून एक व्हिडीओ व्हायरल केला, त्यामुळे त्यांच्या समर्थकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्यावर अनेक आरोप झाले, आपली प्रतिमा मलीन करण्याचा आणि मार्गात अडथळे आणण्याचे प्रयत्नही झाले, मात्र आपल्याविरुद्ध काहीही सिद्ध झाले नाही, आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, आपण निष्पाप आहोत, असे अजित पवार स्पष्ट करीत असल्याचे सदर व्हिडीओमध्ये दिसत आहे.

राज्य विधिमंडळात आपण लोकाभिमुख आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, दुर्बल घटकातील महिलांसाठी योजना आणल्या, तरीही काहीजण माध्यमांद्वारे आपल्याला लक्ष्य करीत आहेत, या प्रचाराला बळी पडू नका, अशी आपली विनंती आहे, असे अजित पवार हे या व्हिडीओमध्ये आवाहन करताना दिसत आहेत. जे नेते आपला पक्ष सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार करीत आहेत, त्यांचे मन वळविण्यासाठी अजित पवार हे लवकरच मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांच्या एका निकटच्या सहकाऱ्याने 'एफपीजे'ला सांगितले. आपल्या भाषणाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करणे हा त्या मोहिमेचाच एक भाग आहे, असे अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले.

अजित पवार गटातील पाच आमदार शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी 'एफपीजे'ने दिले होते. हे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. या पाच आमदारांपैकी दोन पुण्यातील तर नाशिक आणि अहमदनगरमधील प्रत्येकी एक आमदार आहे.

राजकीय जीवनात आपण एकदाही पक्ष बदलला नाही, आपण राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडली नाही, हा आपला पक्ष असून आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत, लोक आपल्याला गद्दार म्हणतात, परंतु आपण आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी समितीमध्ये घेतलेल्या निर्णयाचे पालन केले, असा दावा अजित पवार यांनी केला. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा तुम्हाला लाभ होईल. असे सांगून अजित पवार यांनी आपल्या निवासस्थानी बोलाविलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांचे मन वळविण्याचा बुधवारी प्रयत्न केला. आमदारांना केवळ विकासनिधीच मिळणार नाही, तर विधानसभेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारीही मिळेल. असे सांगून अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते.

'त्यांना' जाणीव झाली पाहिजे - सुप्रिया सुळे

या सर्व प्रकरणावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही नेते आपल्याला लक्ष्य करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी एका व्हिडीओद्वारे केला असला तरी असे आरोप भाजपकडूनच केले जात असल्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. भाजपच आरोप करीत असल्याने अजित पवार यांनी त्यांनाच याबाबत जाब विचारला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in