Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. अपघातापूर्वी, विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूरने मेडे (MAYDAY आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल) कॉल केला नव्हता. तर, त्यांच्यासोबत असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक...
दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; महिला पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट
दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; महिला पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी चार्टर्ड विमान लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नावेळी क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. 'फ्लाइटरडार'च्या डेटानुसार, बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ (VT-SSK) हे विमान सकाळी ८.१० वाजता मुंबई विमानतळावरून उडाले होते आणि सुमारे ८.३० वाजता बारामती विमानतळावर पहिला लँडिंग प्रयत्न करण्यात आला. मात्र, विमान ऑपरेटर VSR Ventures यांच्या म्हणण्यानुसार खराब दृश्यतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

सुमारे १६ वर्षे जुने हे विमान त्यानंतर ८.४२ वाजताच्या सुमारास दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत होते. मात्र ८.४५ वाजता ते अचानक रडारवरून गायब झाले. त्याच वेळेस विमान धावपट्टी क्रमांक ११ च्या सुरुवातीच्या टोकाजवळ कोसळल्याची माहिती समोर आली. अजित पवार यांच्यासोबत विमानात त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी (एचसी) विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला.

MAYDAY कॉल नाही; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. अपघातापूर्वी, विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूरने मेडे (MAYDAY आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल) कॉल केला नव्हता, परंतु त्यांच्यासोबत असलेल्या कॅप्टन शांभवी पाठकचे शेवटचे शब्द होते - ओह शिट...ओह शिट.

विमान कोणते? अपघाताचा इतिहास काय?

अजित पवार प्रवास करत असलेले विमान बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ प्रकारचे होते. हे ६ ते ८ आसनी ट्विन-इंजिन खासगी जेट असून दिल्लीस्थित VSR Ventures Private Limited या चार्टर्ड विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे आहे. हे मॉडेल १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले असून वेग, इंधन कार्यक्षमता आणि उंचावरून उड्डाण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. संबंधित विमान २०१० मध्ये तयार करण्यात आले होते. या जेटचा वेग ताशी ८०० ते ८५० किलोमीटर, तर पल्ला सुमारे ३,००० किलोमीटर आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सविस्तर चौकशी करणार असून ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि कॉकपिट रेकॉर्डिंग तपासल्यानंतरच अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे. VSR Ventures च्या एका अधिकाऱ्याने प्राथमिक अंदाज व्यक्त करताना सांगितले की, “विमान पूर्णपणे सुरक्षित होते आणि क्रू अनुभवी होता. मात्र खराब दृश्यतेमुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे.”

याआधी अपघाताचा इतिहास?

या विशिष्ट विमानाचा यापूर्वी कोणताही अपघाताचा इतिहास नाही. मात्र VSR कंपनीचेच लिअरजेट ४५XR (VT-DBL) हे विमान १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईत मुसळधार पावसात क्रॅश-लँड झाले होते. त्या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले होते, मात्र सर्व आठ प्रवासी बचावले होते, जरी काही जण जखमी झाले होते.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in