

राहुल इंगळे-पाटील
बारामतीच्या मातीत विसावलेली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांची अखेरची झेप एका झंझावाती नेतृत्वाचा शेवट करून गेली. पहाटेपासून कामाला लागणारा 'रिझल्ट ओरिएंटेड' नेता, तिजोरीला वित्तीय शिस्त लावणारा अर्थमंत्री आणि शब्दाचा पक्का 'दादा माणूस' म्हणून त्यांनी उमटवलेला ठसा कधीही पुसता येणार नाही. त्यांच्या जाण्याने प्रशासकीय वज्रमूठ आणि विकासाचा पहाडी आवाज कायमचा शांत झाला आहे.
प्रशासकीय शिस्तीचा 'नंदीग्राम'
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर ती गतीमान प्रशासनाची एक 'ब्रँड' होती. सकाळी साडेसहा-सात वाजता पुण्याच्या वा राज्याच्या कानाकोपऱ्यात जेव्हा एखादा प्रोजेक्ट तपासण्यासाठी दादा हजर असायचे, तेव्हा ते फक्त अधिकारीच नव्हे, तर पत्रकारांनाही घड्याळाच्या काट्यावर चालवायचे. अजितदादांच्या राजकीय प्रवासात 'वक्तशीरपणा' हा त्यांचा सर्वात मोठा दागिना होता.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या तिजोरीवर जी वित्तीय शिस्त लावली, ती अभूतपूर्व होती. "जे काम होऊ शकते ते होईल आणि जे होणार नाही ते स्पष्टपणे तोंडावर सांगण्याची निर्भीडता" हे त्यांच्या नेतृत्वाचे गमक होते.
बारामती ते राज्यव्यापी झेप
२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगरच्या देवळाली प्रवरा येथे जन्मलेल्या अजितदादांचा राजकीय प्रवास १९८२ मध्ये सहकारी संस्थांमधून सुरू झाला. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून लोकसभेवर गेले, पण काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी ती जागा आनंदाने सोडून दिली.
तिथून सुरू झालेली त्यांची ही वाटचाल सलग सातवेळा आमदार आणि तब्बल पाच वेळा उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचली.
शेतकरी, पाणी आणि विकास
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेहमीच ग्रामीण महाराष्ट्र राहिला. पाणी व्यवस्थापन आणि सिंचन या विषयांत त्यांना असलेली गती आणि रस वाखाणण्याजोगा होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले. "बस वा वाहने गरागरागरा फिरत..." अशा शैलीत रिंग रोडचे महत्त्व पटवून देणारे दादा हे आधुनिक विकासाचे पुरस्कर्ते होते. शेतकरी पुत्राचे दुःख त्यांना ठाऊक होते, म्हणूनच अर्थसंकल्प मांडताना त्यांनी नेहमीच कृषी क्षेत्राला झुकते माप दिले.
सहृदयी 'दादामाणूस'
कठोर प्रशासकाच्या पडद्याआड एक संवेदनशील माणूस दडलेला होता. दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी स्वतः रुग्णालयात बसून फोन उचलणारे अजित पवार असोत, किंवा चित्रातले आपले 'ध्यान' पाहून त्यावर मिश्किल टिप्पणी करणारे दादा असोत; त्यांचे हे रूप लोभस होते.