मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज २५ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर पहिल्यांदाच हा वर्धापनदिन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मुंबईतील षन्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवारांबद्दल बोलताना अजितदादा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या वाटचालीत शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असं अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अजितदादा?
"आज राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना पक्षातील काही महत्त्वाचे नेते आपल्यासोबत नाहीत, याची खंत वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून २४ वर्ष पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो," असं अजित पवार म्हणाले. यादरम्यान त्यांचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगरमध्ये मेळावा-
अहमदनगरमधील न्यू आर्ट कॉलेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वर्धापन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसभेतील यशाचा विजयोत्सव साजरा करण्यात येणार असून विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली जाणार आहे. या मेळाव्याला पक्षाच्या नवनियुक्त खासदारांसोबत सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार या कार्यक्रमात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.