

भीषण विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (दि.२९) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी सर्वप्रथम अंत्ययात्रा निघेल, त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. प्रशासनाकडून त्याची तयारी सुरू झाली आहे.
आज रात्रीपर्यंत अंत्यदर्शन, उद्या सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा
अजित पवार यांचे पार्थिव आज सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर, उद्या सकाळी अंत्ययात्रा निघेल. सकाळी ९ वाजता गदीमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरूवात होईल आणि विद्या प्रतिष्ठान चौक, भिगवण रोड सेवा रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या गेटवर जाईल.
मोदी, शहा उपस्थित राहणार
अजित पवारांवरील अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बारामतीत उपस्थित राहणार आहेत. तसेच, दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजित दादांच्या निधनामुळे बारामतीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरण आहे.
दरम्यान, राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.