अजित पवार गटाचे कॅव्हिएट, शरद पवार गटाच्या याचिकेआधी उचलले पाऊल

अजित गटाच्यावतीने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी हे कॅव्हिएट दाखल केले असून शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतल्यास आपली बाजू ऐकली जावी, यासाठी हे पाऊल उचलले आहे.
अजित पवार गटाचे कॅव्हिएट, शरद पवार गटाच्या याचिकेआधी उचलले पाऊल
Published on

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने रद्द केल्यानंतर पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, तत्पूर्वीच अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दा‌खल केले आहे. अजित गटाच्या वतीने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी हे कॅव्हिएट दाखल केले असून शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतल्यास आपली बाजू ऐकली जावी, यासाठी हे पाऊल उचलले आहे.

निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकारमधील अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले आहे. आयोगाने राष्ट्रवादीला पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला चिन्ह दिले आहे. सहा महिने चाललेल्या १० सुनावणींनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. बहुसंख्य आमदारांनी अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे आयोगाने म्हटले आहे. यावर अजित पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीत बहुमताला महत्त्व दिले जाते. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले आहे.’’

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्याबद्दल अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. हा निर्णय आमच्या बाजूने आला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास कायदेशीर मार्गाने योग्य उत्तर देऊ. ५० हून अधिक आमदार, बहुतांश जिल्हाप्रमुख आमच्यासोबत आहेत. विकासकामे करणे महत्त्वाचे आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in