अजित पवार म्हणजे पक्ष नाही

पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार : शरद पवारांचा पुतण्यावर निशाणा
अजित पवार म्हणजे पक्ष नाही

कराड: अजित पवार म्हणजे पक्ष नाही. आम्ही राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. अजित पवारांसह इतरांना अपात्र करण्याच्या भानगडीत पडणार नाही किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करणार नाही. आम्ही जनतेत जाणार आहोत, त्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कार्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यातून चुकीच्या गोष्टींना विरोध केला जातो असे म्हणतात, त्याची सुरुवात येथूनच करतोय. असे सांगत शरद पवार यांनी बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकले.
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी सोमवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी त्यांना अभिवादन करत पक्षवाढीचा एल्गार पुकारला. त्यानंतर त्यांनी उपस्थित जनसमुदायासह माध्यमांशी संवाद साधत पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. ‘‘ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत बंडखोर आमदारांना इशारा देत पवारांनी भाजपसह राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर निशाणा साधला.
पवार म्हणाले, ‘‘काही लोकांनी महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे काम केले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल, याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हे बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सहकारी भ्रष्टाचारात सहभागी झालेत असे म्हटले होते. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, तेच त्यांच्याच पक्षाच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. म्हणजे पंतप्रधानांचे आरोप वास्तव्य नव्हते, ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. त्याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत खा. पवार यांनी मोदींच्या आरोपांची खिल्ली उडवली.
शरद पवार म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी राजकीय पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता आपण सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे. काही जणांकडून समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. फोडाफोडीच्या भाजपच्या या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. परंतु मी आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in