अजित पवारांना हवीय महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे राज्यातील सत्ताधारी महायुतीचे प्रमुख घटक आहेत. तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी १५ जानेवारी रोजी निवडणुका होणाऱ्या शहरी भागांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेतला आहे आणि या संदर्भात ते उपमुख्यमंत्री असलेल्या पवार यांच्याशी सल्लामसलत करतील. महायुती कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे तटकरे म्हणाले. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू असल्याची कबुली तटकरे यांनी दिली. मी निवडणुका हाताळणाऱ्या भाजप नेत्यांनाही फोन केला आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. बैठकीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई-ठाणे विभागातील कल्याण' डोंबिवली, ठाणे शहर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महानगर पालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत राजकीय परिस्थिती आणि महायुती म्हणून सामोरे जाताना नेमकी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत व आतापर्यंत संबंधित महानगरपालिकेत मित्रपक्षांशी चर्चा झाली असेल याबाबतचा अहवाल घेतला, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in