
पुणे : महायुतीमध्ये 'मोठा भाऊ' किंवा 'छोटा भाऊ' असे काही नाही. सर्व घटक पक्षांना सर्व जागा लढण्याचा अधिकार आहे आणि ते तसे मांडूही शकतात. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची वेळ आल्यावर, महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते, ज्यात रामदास आठवले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे, एकत्र बसून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतील. सध्या प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सदस्य नोंदणीचे काम करत आहे, आणि हा त्यांचा संवैधानिक अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दलच्या चर्चांनाही जोर धरला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आपापल्या पक्षाचे (मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख आहेत. 'इंजिन' (मनसेचे चिन्ह) आणि 'मशाल' (उबाठा गटाचे चिन्ह) यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. यावर आपण किंवा इतरांनी विचार करून काही उपयोग नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काय निर्णय घ्यावा, याचा निर्णय त्यांचे नेतेच घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. इतरांनी यात लक्ष घालण्याचे किंवा भाष्य करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सूचित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेबद्दल चार आठवड्यांत माहिती देण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशावरही प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. न्यायालयाने विचारले असल्याने ती माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावेच लागेल, आणि जर कमी वेळेत ही प्रक्रिया शक्य नसेल तर तसे न्यायालयाला कळवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
तत्कालीन अमिताभ गुप्तांच्या कार्यकाळात दिलेल्या ४५०० शस्त्र परवान्यांपैकी अनेक परवाने योग्य नसल्याने रद्द करण्यात आले आहेत, ही एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त (सीपी) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) यांना या परवान्यांचा फेरआढावा घेण्यास सांगितल्याचे पवार म्हणाले. " परवाने देताना अनेक वेळा गरज नसलेल्या व्यक्तींनाही परवाने दिले गेले. काही प्रकरणांमध्ये शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही राजकीय ओळख वापरून परवाना मिळवला गेला. अशा सर्व प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी नमूद केले. अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला यंदा ३९ ते ४१ टक्के वाढ करून अधिक निधी दिला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. याच संदर्भात त्यांनी मंत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा माध्यमांशी बोलण्याऐवजी कॅबिनेट बैठकीतच आपले मत मांडण्याचा सल्ला दिला. "माझं मंत्र्यांना सांगणं आहे की, कॅबिनेट बैठक असते, इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे. तरच समज-गैरसमज होणार नाहीत," असे ते म्हणाले. काही जण चुकून बोलून जातात, तर काही जणांना चुकीच्या बातम्यांना विषय मिळतो आणि त्या सुरू होतात. "जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा, म्हणजे आम्हाला पण कळेल," असे म्हणत त्यांनी मंत्र्यांना अधिक जबाबदारीने बोलण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन : दोन्ही गटांना अधिकार
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली होती. त्यामुळे दोन्ही गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) १० जून रोजी आपला २६वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. यावर कोणताही वाद नसल्याचे आणि दोघांनाही वर्धापन दिन साजरा करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.