अजित पवार फडणवीसांच्या भेटीला; सागर निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन, जागावाटपाबाबत चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा भेट देत लाडक्या गणरायाचे दर्शन घेत जागावाटपाबाबत चर्चाही केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा भेट देत लाडक्या गणरायाचे दर्शन घेत जागावाटपाबाबत चर्चाही केली होती.
अजित पवार फडणवीसांच्या भेटीला; सागर निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन, जागावाटपाबाबत चर्चा
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा भेट देत लाडक्या गणरायाचे दर्शन घेत जागावाटपाबाबत चर्चाही केली होती. विशेष म्हणजे, महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीतच पवार-शिंदे भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता सोमवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. मात्र या भेटीत जागावाटपाबाबत चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीआधी काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनीही सागर बंगल्यावर धडक दिल्याने पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जुंपली आहे. ही योजना अजित पवारांची लाडकी बहीण अशी जाहिरातबाजी करण्यात आली. यावरून अजित पवार विरुद्ध भाजप आणि शिंदे असा वादही रंगला. मात्र वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरा खलबते झाल्यानंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्येही सागर बंगल्यावर जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जाते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमिन पटेल हे सोमवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि संजय निरूपम हे नेते महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यामुळे अमिन पटेल यांच्या भेटीमुळे तेदेखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षात सामील होणार का, अशी चर्चा सुरू आहे. मात्र अमिन पटेल यांनी हे आरोप फेटाळले असून आपण गणपती दर्शनासाठी आणि बुधवारी येणाऱ्या ईद-ए-मिलादसाठी काढण्यात येणाऱ्या जुलूसच्या परवानगीसाठी पोलिसांकडून सहकार्य मिळावे, म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे अमिन पटेल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in