देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भान ठेवून बोला; अजित पवार यांच्याकडून मंत्री, आमदारांची कानउघाडणी

आमदार, मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारला टीकेचा सामना करावा लागतो.‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असून काही बोलताना भान ठेवून बोला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री, आमदारांची कानउघाडणी केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असून त्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भान ठेवून बोला; अजित पवार यांच्याकडून मंत्री, आमदारांची कानउघाडणी
Published on

मुंबई : आमदार, मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारला टीकेचा सामना करावा लागतो.‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असून काही बोलताना भान ठेवून बोला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री, आमदारांची कानउघाडणी केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असून त्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. हनी ट्रॅप, रमी अशा विविध मुद्द्यांवरून राजकारण तापले असून रोज उठून बोलण्यापेक्षा एकदाच काय ते बाहेर काढा, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिला.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित करत पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाराष्ट्रातील ७२ आजी-माजी अधिकाऱ्यांसह राजकारणी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. नाशिकपासून मुंबईपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप नेते प्रफुल लोढा यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध हनी ट्रॅप आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपवरून बरीच चर्चा झाली. मात्र सरकारकडून हा दावा सातत्याने फेटाळण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा चार मंत्री ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांनी देखील हनी ट्रॅपवरून सत्ताधारी नेत्यांवर आरोप केले. आता या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर भूमिका मांडली.

दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडीओ असेल पेनड्राइव्ह असेल, तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या, विनाकारण धमक्या देऊ नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले.

‘प्रत्येक राज्यातली मातृभाषा महत्त्वाची’

राज्यात सध्या मराठी आणि अमराठी असा वाद सुरू असताना अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनी भान ठेवून वागले आणि बोलले पाहिजे. प्रत्येक राज्यातली मातृभाषा महत्त्वाची असते. परंतु त्या मातृभाषेबरोबर आपला भारत देश आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते. तसेच तिसरी भाषा कुठली चालत असेल तर इंग्लिश चालते. अशा प्रकारचे साधारण गणित आपण पाहत आहोत. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाहिले तर सगळीकडे हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान, आदर, प्रेम असले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

अणुशक्ती नगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाला गती द्या!

अणुशक्ती नगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेले १०,३३३.९१ चौ.मी. क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अणुशक्ती नगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in