अजित पवारांनी प्रोटोकॉल पाळला नाही; चार माजी आमदारांना प्रवेश दिल्याने गिरीश महाजनांची नाराजी

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊ नये, असे ठरले असतांना अजित पवार यांनी जिल्ह्यातील चार आमदारांना शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत प्रोटोकॉल पाळला नाही, या बद्दल भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांनी प्रोटोकॉल पाळला नाही; चार माजी आमदारांना प्रवेश दिल्याने गिरीश महाजनांची नाराजी
एक्स @mahancpspeaks
Published on

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊ नये, असे ठरले असतांना अजित पवार यांनी जिल्ह्यातील चार आमदारांना शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत प्रोटोकॉल पाळला नाही, या बद्दल भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे चार माजी आमदारांनी शनिवारी शरद पवार गट सोडून देत मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केला. या प्रसंगी अजित पवारसह प्रदेशाध्यक्ष तटकरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते तर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेशासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी मंत्री पारोळ्याचे डॉ. सतीश पाटील,जळगावचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, पाचोराचे माजी आमदार दिलीप वाघ,चोपडा येथील माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

या प्रवेशावर महायुतीत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले की, मविआमधील कोणालाही प्रवेश देतांना त्या जिल्ह्यातील इतर मित्रपक्षांना विश्वासात घ्यावे असे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरले होते. तो प्रोटोकॉल अजित पवारांनी या चार जणांना प्रवेश देऊन मोडीत काढला. याबाबत आता भाजप अजित पवारांशी बोलेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला ते सर्व भाजपात येण्यास उत्सुक होते पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यास विरोध दर्शवल्याने त्यांना भाजपमध्ये घेतले नाही. अजित पवारांनी मात्र कुणाशीही चर्चा न करता प्रवेश दिला, या बद्दल नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारात देवकरांनी पाटलांच्या विरोधात अनेक आरोप कले होते. या प्रवेशावर प्रतिक्रिया देतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, ही मंडळी पक्षवाढीसाठी आलेली नाही तर आपले गैरकृत्य लपवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गेली आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होतील,अशी त्यांना अपेक्षा आहे पण वाटच पाहत रहा, असे म्हणत विषय संपवला.

पक्षाचे अस्तित्वच धोक्यात

२००९ मध्ये जिल्ह्यात भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती. जिल्ह्यात दोन मंत्रीसह पाच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते.शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात होता असे असले तरी  २०१४ मध्ये मोदी लाटेत ही स्थिती बदलली आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे  विभाजन झाल्यानंतर या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले. शरद पवार गट विरोधी पक्षात असल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी प्रवेशानंतर बोलतांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in