महायुतीत राहूनही राष्ट्रवादीची तिरकी चाल; अजितदादांचा स्वतंत्र बाणा, आज देणार राजकोट किल्ल्याला भेट

राज्यातील सत्तारूढ महायुतीमधील एक घटक पक्ष असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पावले वेगळी पडत असल्याचे संकेत अलीकडील काळात पक्षाकडून देण्यात येत आहेत.
महायुतीत राहूनही राष्ट्रवादीची तिरकी चाल; अजितदादांचा स्वतंत्र बाणा, आज देणार राजकोट किल्ल्याला भेट
Published on

मुंबई : राज्यातील सत्तारूढ महायुतीमधील एक घटक पक्ष असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पावले वेगळी पडत असल्याचे संकेत अलीकडील काळात पक्षाकडून देण्यात येत आहेत. मालवण येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना सर्वप्रथम सत्ताधारी म्हणून राज्याच्या जनतेची माफी मागून त्यांनी लोकसभा निवडणुकीत गमावलेली पत पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच गुरुवारी महायुतीपेक्षा वेगळी वाट धरत राष्ट्रवादीच्या वतीने पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्यात मूक निदर्शने करण्यात आली. त्यामुळे महायुतीत शिंदे-भाजप एकत्रपणे विरोधकांचा प्रहार झेलत असताना राष्ट्रवादीने मात्र या वादात स्वत:ला अलिप्त ठेवल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीतर्फे आत्मक्लेष मूक निदर्शने हे आंदोलन राज्यभरात जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी करण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी पक्षातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. केवळ आठ महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला पुतळा कोसळणे हे वेदनादायक आणि संतापजनक आहे, असेही पक्षाने म्हटले आहे.

मालवण येथे पुतळा उभारताना काही अक्षम्य चुका घडल्याची शक्यता फेटाळण्यात येऊ शकत नाही, जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली आहे. मुंबईत १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीने आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला, त्या पार्श्वभूमीवर मूक निदर्शने आयोजित करण्यात आली. मालवण येथे त्याच ठिकाणी शिवरायांचा मोठा आणि अधिक मजबूत पुतळा उभारण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

अजित पवार, तटकरे आज देणार राजकोट किल्ल्याला भेट

पुतळा पडल्यामुळे निर्माण झालेल्या रोषाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी अनपेक्षितपणे अजित पवार राज्यातल्या १३ कोटी जनतेची माफी मागून मोकळे झाले. आता आपल्या दोन्ही सहकाऱ्यांच्या आधी ते राजकोट किल्ल्यातील पुतळ्याच्या ठिकाणाला शुक्रवारी भेट देत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही त्यांच्यासमवेत असतील, असे समजते.

पुतळा कोसळल्याचे तीव्र पडसाद उमटले, त्याचे संभाव्य राजकीय परिणाम लक्षात घेता राष्ट्रवादीच्या निदर्शनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अलीकडील काळात पवार यांनी विविध प्रश्नांवर स्वत:ला दूर ठेवले आहे. पुतळा कोसळल्याबद्दल पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या अगोदरच राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागितली. जनसन्मान यात्रा सुरू असतानाच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या यात्रेद्वारे ते राष्ट्रवादीची मतपेरणी करत फिरत असतानाच मालवण प्रकरणावरील त्यांच्या मतांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने ते अस्वस्थ होत आहेत. पुतळा पडण्याच्या धक्कादायक घटनेनंतर परिस्थिती बदलली असली तरी अजित पवार आपली यात्रा मध्येच सोडून देऊ शकत नाहीत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, शिवरायांचा पुतळा कोसळणे ही वेदनादायी घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, प्रत्येकाचा तो अधिकार आहे.

भाजपने केलेल्या ‘अब की बार चारसौ पार’ घोषणेबद्दल, कांदा निर्यातीवर यापुढे बंदी नाही, या विधानांनंतर घरात राजकारण आणायला नको होते. लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवून चूक केली, ही अजित पवार यांची अलीकडची विधाने चर्चेचा विषय झाली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर पवार काही वेगळा निर्णय घेतील का, याकडे औत्सुक्याने पाहिले जात असले तरी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्याने अजित पवार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता नाही. सरकारमध्ये सहभागी असल्याचा लाभ पक्ष उठविणार, अधिकाधिक निधी आपल्या आमदारांना वितरीत करणार, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

तिसरी आघाडी तयार करण्याचे भाजपचे प्रयत्न - रोहित पवार

अचलपूरचे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आणि माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडावी यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्थेला भाजपनेही अनुकूलता दर्शविली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या आघाडीत सहभागी होईल, असा दावा आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार) यांनी केला आहे.

राणेंवर तटकरे, मिटकरींची टीका

दरम्यान, भाजप आमदार नीतेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात गुरुवारी शाब्दिक चकमक उडाली. राणे यांच्या काही वक्तव्यांवरून मिटकरी म्हणाले की, राणे यांना नेपाळला पाठविण्यास जनता उत्सुक आहे. तर नारायण राणे यांनी बुधवारी किल्ल्याच्या ठिकाणी केलेली वक्तव्ये अयोग्य असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. पुतळा कोसळल्याची घटना वेदनादायी असली तरी जबाबदार नेत्याला अशी भाषा शोभत नाही, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in