शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी शक्य नाही; अजित पवार यांनी केले स्पष्ट, ३१ मार्चपर्यंत बँकांचे पैसे भरण्याची सूचना

कर्ज माफ करावे अशी सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाही, पैशांचे सोंग आणता येत नाही, याचा पुनरुच्चार करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकऱ्यांसह अन्य कर्जदारांनी कर्जमाफीचा विचार सोडून द्यावा आणि ३१ मार्चपर्यंत बँकांचे पैसे त्वरित भरावे असे स्पष्ट केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

बारामती : कर्ज माफ करावे अशी सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाही, पैशांचे सोंग आणता येत नाही, याचा पुनरुच्चार करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकऱ्यांसह अन्य कर्जदारांनी कर्जमाफीचा विचार सोडून द्यावा आणि ३१ मार्चपर्यंत बँकांचे पैसे त्वरित भरावे, असे शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

मी महाराष्ट्राचा ११ वेळा लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांना वीज माफी दिली, पीक कर्जाच्या व्याजात सवलत दिली, दुधाचे अनुदान दिले, लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे ४० हजार कोटींचा बोजा सरकारने पेलला. यापुढे अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण तयार करण्यासाठी शिस्तीने वागण्याची जबाबदारी जशी राज्यकर्त्यांची आहे तशी प्रत्येक घटकांचीही आहे, अशी भूमिकाही पवार यांनी माळेगावात स्पष्ट केली.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासनाने नूतनीकरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर ऊस पिकासह कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम अर्थकारणावर दिसून येतील, असेही ते म्हणाले.

या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. राज्यात बहुतांशी साखर कारखान्यांची गाळप क्षमता दुप्पट झाली आणि त्या तुलनेत उसाची उपलब्धता होत नाही. त्यासाठी एआय तंत्रज्ञान बारामतीमध्येच विकसित झाले आहे. एकरी ऊस उत्पन्न शंभर टनापेक्षा अधिक होण्यासाठी पाणी, खत व्यवस्थापन करणे या तंत्रज्ञानाने सोपे झाले आहे. एका बाजूला शिवारात एआय तंत्रज्ञान येण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत आर्थिक मदत करणे आणि दुसऱ्या बाजूला १ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी कऱ्हा व नीरा नदी उपसा सिंचन योजना बारामतीत यशस्वी करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून खूप प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in