Ajit Pawar : "चांगलं सांगायला गेलो तरी..."; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अहमदनगरच्या पाथर्डीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, "शिंदे-फडणवीस सरकारला काही चांगला सांगायला गेलो तरी त्यांना राग येतो. आम्ही पण अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. पण विरोधकांनी सांगितल्यानंतर ज्या गोष्टीची नोंद राज्यकर्ते म्हणून घ्यायला पाहिजे ती आम्ही घेत होतो. यांना सांगितले तर त्यांना राग येतो." असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले, तुम्ही माझे दोन-अडीच कोटीचे चहाचे बिलच काढले. मी काही सोन्याचा चहा देत नव्हतो, सोन्यासारख्या माणसांना चहा देत होतो. आम्ही काय दुसऱ्या माणसांना चहा देतो, आम्ही पण सोन्यासारख्या माणसांना चहा देतो. काही पण उत्तरे देतात, कशाला कशाचा मेळ नाही." असे म्हणत अजित पवारांनी सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, "परदेशात गेले, इतका खर्च केला. खर्च केला तर कारखाने आले का? आमच्या काळातही दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेले कारखाने परराज्यात गेले, याला जबाबदार कोण? पुण्यात चाकण परिसरात दोन लाख रोजगार निर्माण होणार होते. गेला तो प्रकल्प, म्हटले दुसरा आणू पण कशाच काय आणि कशाचे काय? असे अनेक कारखाने गेले." असा आरोप त्यांनी यावेळी केला.