मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून मदत व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. लहू माळी यांनी त्यांना माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून राज्यातील प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि तेथील परिस्थितीची माहिती घेतली. मदत व बचावकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे तसेच नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.