मुंबई गोवा महामार्गावर खड्डे दिसताच २४ तासात बुजवा; अजित पवार यांचे आदेश, कोलाड ते माणगांव बायपासला २१ कोटींचा निधी

गणेशोत्सवात रस्ते मार्गांनी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर खड्डे दिसताच २४ तासात बुजवा; अजित पवार यांचे आदेश, कोलाड ते माणगांव बायपासला २१ कोटींचा निधी
Published on

मुंबई : गणेशोत्सवात रस्ते मार्गांनी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची तक्रार प्राप्त होताच २४ तासात बुजवा, असे सक्त आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसेच कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार सुनिल तटकरे यांच्या पुढाकाराने आज मुंबई-गोवा महामार्गावरील गैरसोयी दूर करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी, मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबधित अधिकारी आणि जनआक्रोश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून कोकणातील गणेशोत्सवाला सुरूवात होते. गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची भूमिकाखासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी मांडली.

यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोरणात्मक निर्णय घेत, ज्या - ज्या ठिकाणी बोगद्यांच्या अपूर्ण कामामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे अशा कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करत ही कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले.

जनआक्रोश समितीचे आंदोलन

दरम्यान, १० ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने पळस्पे फाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू केल्याची बाब तटकरे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. यावर, जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करत अनेक मागण्या करण्यात आला आहेत.

logo
marathi.freepressjournal.in