... म्हणून विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी सांगितले कारण

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानाची आमंत्रण दिले मात्र, महाविकास आघाडीने यावर बहिष्कार टाकला.
... म्हणून विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी सांगितले कारण

नागपूरमध्ये १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. यावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत दिली. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही. मात्र इतर गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसते. जनतेच्या मनातील सरकारबद्दलचा विश्वास संपुष्टात आला आहे. म्हणून त्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. हा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, गेल्या ६ महिन्यात या सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यांचे अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबतसुद्धा अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. तब्बल ८६५ गावांचा प्रश्न अजूनही कायम आहे. तर, दुसरीकडे राज्यातली काही गावे दुसऱ्या राज्यात जाण्याचा ठराव करू लागली आहेत. अशा घटना गेल्या ६२ वर्षात कधीच घडल्या नव्हत्या. याउलट दुसऱ्या राज्यातील गावे आपल्या राज्यात येण्यास इच्छुक होती. पण, सध्याची परिस्थिती फारच वेगळी आहे. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटींची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना आता महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणाऱ्यांमधले आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in