

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या प्रकरणाची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू असतानाच, व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी या अपघातासाठी थेट वैमानिकाला जबाबदार धरले आहे. ‘या अपघातात माझी कोणतीही चूक नाही, सर्वस्वी चूक वैमानिक सुमित कपूर यांचीच आहे,’ असा जबाब सिंग यांनी सीआयडीसमोर नोंदवला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सीआयडीकडून व्ही. के. सिंग यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान सिंग यांनी स्वतःचा बचाव करत सर्व दोष वैमानिकावर ढकलला आहे. ‘जर या प्रकरणात माझी काही चूक आढळली तर मला हवी ती कठोर शिक्षा करा, पण तांत्रिकदृष्ट्या हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळेच झाला आहे,’ असे त्यांनी आपल्या जबाबात ठामपणे म्हटले आहे.
रोहित पवारांचा सवाल : यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
विमान अपघात चौकशी प्राधिकरणाने (एएआयबी) सादर केलेल्या २२ पानांच्या प्राथमिक अहवालात काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. अहवालानुसार, बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हे विमान कोसळले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमान झाडावर आदळले होते. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा बारामती विमानतळावर ३ हजार मीटरपर्यंतची दृश्यमानता चांगली होती. तसेच, प्राथमिक वैद्यकीय तपासणीत पायलटने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, या अहवालात बारामती विमानतळावरील अपुऱ्या सुविधांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. विमानतळावर आवश्यक असलेल्या काही तांत्रिक सुविधांचा अभाव अपघाताला कारणीभूत ठरला असावा, असा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे. सध्या सीआयडीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, ब्लॅक बॉक्सचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
आमदार रोहित पवारांचा आक्षेप
आमदार रोहित पवार यांनी या चौकशी प्रक्रियेवर आणि व्ही. के. सिंग यांच्या जबाबावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘अपघाताचा तपास पूर्ण झालेला नाही, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत अद्याप स्पष्टता नाही, मग अपघात झाल्या झाल्या कंपनी मालकाला वैमानिकाची चूक आहे हे कसे कळले?" असा सवाल त्यांनी केला. तपासाच्या नावाखाली बातम्या पेरल्या जात असून तपासाचा मूळ रोख वळवण्याचा प्रयत्न होत आहे. दुसऱ्याला तोफेच्या तोंडी देऊन स्वतः नामनिराळे राहण्याचा हा डाव असल्याची टीकाही त्यांनी सिंग यांच्यावर केली आहे.