

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची चौकशी आधीच सुरू झाली आहे. त्यांच्या पक्षातर्फे सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत देखील मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. कोणाच्या मनात जर शंका असतील तर त्यांनी त्या ‘डीजीसीए’ किंवा आमच्याकडे द्याव्यात, त्यांचा निश्चित विचार करण्यात येईल. या अपघातामागचे तथ्य बाहेर आलेच पाहिजे, अशी आम्हा सर्वांचीच इच्छा असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे मांडली.
मंत्री झिरवाळ यांच्या विरोधात पुरावा नाही
माझ्या कार्यालयातही जर कोणी लाचखोरी करत असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. पण मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लाचखोरी प्रकरणात कोणताही पुरावा मिळालेला नाही. नाहीतर त्यांनाही आम्ही राजीनामा देण्यास सांगितले असते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. अल्पसंख्याक शाळा मंजुरी प्रकरणाची चौकशी सुनेत्रा पवार यांच्या अखत्यारित सुरू आहे. त्यात जे तथ्य असेल ते आम्ही मांडू, असेही फडणवीस म्हणाले.
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत सर्व तथ्य जनतेला समजलीच पाहिजेत, ही आमचीही इच्छा असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मी स्वत: देखील ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाने चार ते पाच वेळा प्रवास केला आहे. या अपघाताची डीजीसीए, डीजी सुरक्षा यांच्याकडून चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशीही सुरू केली होती. आता सीबीआय चौकशीबाबत मी स्वत: अमित शहांशी बोललो आहे. डिजिटल रेकॉर्डर आदी डेटा डाऊनलोड केला आहे. डेटा उपलब्ध नाही अशी स्थिती नाही. ‘व्हीएसआर’ कंपनीचे पूर्ण ऑडिट ‘डीजीसीए’ने सुरू केले आहे. त्यांच्या मागील काही वर्षांच्या सर्व विमानांचे ऑडिट सुरू आहे. या चौकशीच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे. कोणाच्याही मनात शंका असेल तर ती शंका संबंधित संस्थेकडे व्यक्त केली पाहिजे. ‘डीजीसीए’ला पत्र लिहावे किंवा आम्हाला द्यावे. केंद्र सरकारला आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला यात लपवण्यासारखे काही आहे, असे वाटत नाही. पण कोणत्याही पद्धतीने अजितदादांचा अपमान होईल किंवा त्यांच्या परिवाराला त्रास होईल, अशा पद्धतीने कोणी वागू नये.
उद्या एखादी तक्रार आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातही धाड पडेल. धाडीचा फडणवीस किंवा झिरवाळांशी संबंध नसतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की तक्रार आल्यानंतर कोणाविरोधात तक्रार आहे ते बघू नका. उद्या माझ्याही कार्यालयात जर कोणी अशा पद्धतीने व्यवहार केला तर त्याला पकडण्याची मुभा मी दिली आहे. पण त्यात संबंधित मंत्र्यांचा वरदहस्त आहे, असे होत नाही. याप्रकरणी कुठल्याही पुराव्यात मंत्र्यांचे नाव आले नाही. नाव आले असते तर मंत्र्यांचा निश्चित राजीनामा मागितला असता, असे फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी हे करण्यात आले का? या प्रश्नावर, आम्ही तिन्ही पक्ष समन्वयाने चाललो आहोत. आम्हाला अशा प्रकारचे धंदे करण्याची आवश्यकता नाही. असले प्रकार मंत्रालयात होवो वा तहसीलदाराच्या कार्यालयात होवो, राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचतोच. ते कोणत्याही शासनाला भूषणावह नसते. पण आम्ही याबाबत ‘झिरो टॉलरन्स’ ठेवला आहे. रोज कारवाई सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.
दुर्दैवाने माझ्यावर अर्थसंकल्प मांडण्याची वेळ
६ मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. अजितदादांनी या अर्थसंकल्पासाठी प्रचंड तयारी केली होती. एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली. अर्थमंत्री म्हणून अजितदादांना मी जवळून पाहिले आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थ खाते निर्धास्तपणे देता येईल, असे अर्थमंत्री अजितदादा होते. अर्थ खात्याची शिस्त ते पाळायचे. कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा सांगणार की हे आर्थिक शिस्तीत बसत नाही, हे आम्हाला माहिती होते. आवश्यक तिथे ते मार्गदेखील काढून द्यायचे. सुनेत्रावहिनी पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरे जात आहेत. त्यादेखील दादा ज्या प्रकारे ठामपणे भूमिका मांडायचे त्या प्रकारे अधिवेशनाला सामोरे जातील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून जनादेशाचा अपमान
विरोधकांचे सहा पानी पत्र मिळाले. विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार हजर नव्हते. त्यांनी एका माजी आमदाराचीच सही त्यावर घेतली. विरोधकांच्या पत्रात मराठीच्या इतक्या चुका आहेत हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखविले असते तर त्यांच्याकडच्या तज्ज्ञांना दाखवून त्यांनी सुधारून दुरूस्त करून घेतले असते. दैनिकात ज्या बातम्या छापतात त्यातील परिच्छेद जसेच्या तसे त्यांनी छापले आहेत. सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचे काम विरोधकांकडून होते, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी विरोधकांवर सोडले.