

अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या अपघाताविषयी अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय यंत्रणा व अमेरिकी पथकाच्या मदतीने सुरू असलेल्या या चौकशीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दुर्घटनेला आठ ते दहा महिने उलटून गेले असल्याने जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांना फासावर लटकवले पाहिजे आणि जर हा केवळ अपघात असेल तर जनतेच्या मनातील आक्रोशाला शांती मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दादांच्या जाण्याचा चटका तर आपल्या सगळ्यांच्या मनाला लागला आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये जनमाणसाच्या मनामध्ये दादांच्या जाण्यानंतर काही प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा देखील झाल्यात आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला असे वाटते की हे जे काही घडले ते नेमके काय आहे? हा अपघात आहे की पाठीमागे काही घडले आहे? हे स्पष्ट व्हावे. महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे. या बाबतीतला जो काही अहवाल आहे, तो लवकरात लवकर आला पाहिजे.
चौकटीत न मावणारे कार्य - एकनाथ शिंदे
अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल, अशी वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. अजितदादांचे कार्य एका चौकटीत मावणारे नव्हते. बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना पुण्याचे शिल्पकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे शिंदे म्हणाले.
ग्रामीण विकासाचा अर्थ दादांकडून शिकले - सुनेत्रा पवार
ज्या जिल्हा परिषदेवर दादांनी मनापासून प्रेम केले, त्याच संस्थेत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या. दादांचा प्रवास मोठा असला, तरी त्यांच्यातील ग्रामीण माणूस कधी बदलला नाही. शेतकरी हा त्यांच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रबिंदू होता. ग्रामीण विकासाचा अर्थ मी दादांकडून शिकले, असे त्या म्हणाल्या.