

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा संशय अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. या अपघाताच्या चौकशीसाठी लागणाऱ्या विलंबाबाबत शंका उपस्थित करत त्यांनी प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी विमाने भाड्याने देणाऱ्या ‘व्हीएसआर कंपनी’सह संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत आणि विशेषतः फ्रान्स आणि ब्रिटनमधील संस्थांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी बारामतीला जात असताना २८ जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असताना, रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जवळपास सव्वा तास सविस्तर सादरीकरण करत या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. सादरीकरणावेळी त्यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याचे नाव न घेता उल्लेख केला. तसेच ‘व्हीएसआर कंपनी’ आपल्या विमानांची देखभाल, दुरुस्ती प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील कंपनीकडून करून घेत असल्याची माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली.
“अजित पवार गेल्या काही महिन्यांपासून सावध वागत होते. आपल्या बाबतीत घातपात घडू शकतो, अशी शंका त्यांच्या वागण्यातून दिसून येत होती. हल्ली ते प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पित होते,” असे सांगत रोहित पवार यांनी प्लास्टिकच्या बाटलीला एक इंजेक्शन टोचून दाखवत असा घातपात घडवला जाऊ शकतो, असे सूचित केले. तसेच अजित पवार यांनी आपल्या जवळच्या काही व्यक्तींना विमान खरेदी करण्याची सूचना केली होती, असा दावाही रोहित पवार यांनी केला.
“उपलब्ध तांत्रिक माहिती आणि वस्तुस्थिती पाहता हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे. यामागे व्हीएसआर विमान कंपनी, मंत्र्यांसाठी विमाने उपलब्ध करून देणारी ॲॅरो कंपनी आणि पायलट कपूर यांची भूमिका संशयास्पद वाटते. ॲॅरो नावाच्या कंपनीने सरकारी नियमानुसार व्हीएसआरचे विमान भाड्याने घेतले होते. या कंपन्यांचे अनेक राज्यांतील बड्या नेत्यांशी संबंध असून या प्रकरणात काहीतरी मोठे रहस्य दडपले जात आहे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.
“व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. त्या अपघाताच्या चौकशीचा अहवाल अद्याप ‘डीजीसीए’ने उघड केलेला नाही. अजितदादांच्या विमान अपघातानंतर हा अहवाल सप्टेंबरमध्ये येईल, असे ‘डीजीसीए’ आता सांगत आहे. म्हणजे या कंपनीचे ‘डीजीसीए’मध्ये लागेबांधे असल्याने आतापर्यंत हा अहवाल दाबला होता. याच अपघाताची माहिती ‘युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी’ने मागवली, पण कंपनीने ही माहिती दिली नाही. त्यामुळे या कंपनीला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली. युरोपियन संस्था हे करू शकतात, मात्र आपल्याकडे अपघात होऊनही या कंपनीला उड्डाणाची परवानगी का दिली जाते? एवढी पोहोच व्हीएसआर कंपनीची आहे का?” असे सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले.
बारामतीची दृश्यमानता कमी होती, असे एका व्हिडिओवरून दिसते. मग दृश्यमानतेबाबत मुद्दाम खोटी माहिती का दिली? वैमानिकाने मुद्दाम हा अपघात घडवून आणला का? की कुणाच्या सांगण्यावरून केला? अपघाताच्या एक मिनिट आधी विमानातील ट्रान्सपॅान्डर बंद का करण्यात आला होता? बारामती ‘एटीसी’ने विमान २९ नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याची दोनदा सूचना केली होती, जी बाजू उतरण्यासाठी अगदी सुरक्षित आहे. मात्र, टेकडीकडील अवघड असलेल्या ११ नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याचा आग्रह वैमानिकाने का धरला होता? वैमानिकाला विमान क्रॅश करायचेच होते का? असे प्रश्नही त्यांनी केले.
“देशातील प्रगत अशा राज्याच्या प्रमुख नेत्याचा मृत्यू होऊनही तपास अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अपघातानंतर १४ दिवसांत तपास करणाऱ्या सीआयडीने फक्त बारामतीतील सीसीटीव्ही फूटेज गोळा केले आहे. मुंबई विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप का तपासले गेले नाही? केवळ बारामतीचे फुटेज तपासून काय साध्य होणार? आपला सीआयडीच्या कार्यक्षमतेवर आक्षेप नाही. मात्र, ते या विषयातील तज्ज्ञ नाहीत. तसेच चौकशी सुरूच नसल्याने आम्हाला हे सगळे करावे लागते,” असेही रोहित पवार म्हणाले.
एका वैमानिकाच्या हवाल्याने उपलब्ध माहितीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, “व्हीएसआर कंपनी नियमांच्या विरोधात जाऊन विमानांमध्ये पेट्रोलचे कॅन ठेवते, जे हवेत बॉम्बसारखे काम करतात. तसेच ब्लॅकबॉक्सचा माईक बंद ठेवला जातो. २०२३ मधील अपघाताचा अहवाल जर दाबला गेला नसता, तर अजितदादांचा अपघात झाला नसता.”
इच्छा नसताना सुनेत्राकाकींना शपथ दिली
प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे अपघाताच्या चौकशीबाबत काही बोलत नसल्याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, “हे नेते सत्तेत राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुनेत्राकाकींची इच्छा नसतानाही त्यांना शपथ देण्यासाठी या नेत्यांनी गडबड केली. पार्थ आणि जय यांनाही ही बाब आवडली नाही. या नेत्यांबाबत लोक काय बोलतात, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.”
अजितदादा गाडीने जाणार होते, पण...
अजित पवारांच्या प्रवासातील ऐनवेळी झालेल्या बदलावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “२७ जानेवारी रोजी संध्याकाळी अजितदादा गाडीने मुंबईहून पुण्याला येणार होते. मात्र पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना उशीर झाला. एका मीडिया एजन्सीची ही फाइल होती. ही फाइल येण्यास वेळ झाल्याने त्यांना आपली प्रवासाची योजना बदलावी लागली. याचदरम्यान मध्यरात्री १२.३० वाजता विमान फायनल झाले. मात्र, उड्डाणापूर्वी अर्धा तास आधी ट्रॅफिकचे कारण देऊन मूळ दोन पायलटऐवजी दुसरेच पायलट का दिले गेले? या बदललेल्या पायलटांचा सीडीआर तपासणे आवश्यक आहे.”