वैमानिकाच्या मदतीने अजित पवारांचा घातपात! रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून केलेला घातपात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला.
वैमानिकाच्या मदतीने अजित पवारांचा घातपात! रोहित पवार यांचा खळबळजनक दावा
(Photo-X/@RRPSpeaks)
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून केलेला घातपात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला. अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करावी, तसेच या प्रकरणाची फौजदारी चौकशीही करावी. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री तथा तेलुगू देसम पक्षाचे नेते के. राममोहन नायडू यांना पदावरून दूर करावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.

रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघातावर सविस्तर सादरीकरण केले. या सादरीकरणाद्वारे त्यांनी अनेक दावे केले. अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याने निष्पक्ष चौकशी होण्याबाबत रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे ते मंत्रिपदावर असताना स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष तपास होणे अशक्य असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजीसीएच्या नियमानुसार, उड्डाणासाठी ५ हजार मीटरची दृश्यमानता बंधनकारक असते. मात्र, त्यादिवशी ३००० फूटाची दृश्यमानता असताना विमान उडायला नको होते. वैमानिकाने पहिली फेरी मारल्यानंतर विमान मुंबईला परत आणायला हवे होते. परंतु, त्याऐवजी मुद्दाम विमान कोसळवले गेले, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या दाव्यावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले.

“डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याने कंपनीच्या मालकांना आणि गुंतवणूकदारांना वाचवण्यासाठी चौकशीला विलंब लावला जात असून मागील तारखांचे कागदपत्र तयार केले जात आहेत. या प्रकरणाच्या तपासावर देखरेख करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीत सेवानिवृत्त नोकरशहा, माजी न्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेते तसेच कुटुंबातील सदस्याचा समावेश करावा,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

सुमारे वर्षभरापूर्वी टीडीपीच्या एका वरिष्ठ नेत्याने व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या राजस्थानमधील विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. आंध्र प्रदेशातील एका मंत्र्याचे खासगी जेटही हीच कंपनी चालवते, तसेच आंध्रतील एका व्यावसायिक गटाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. मंत्र्यांनी आधीच कंपनीला क्लीनचिट दिली आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयाकडून निष्पक्ष तपासाची अपेक्षा कशी करावी? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

यावेळी रोहित पवार यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी ‘डीजीसीए’कडून देण्यात आलेले ‘एअरवर्थिनेस’ प्रमाणपत्र दाखवले. मात्र, नोंदणी प्रमाणपत्र २७ डिसेंबर २०२२ चे आहे. हे कसे शक्य आहे? हे विमान अमेरिकेतून खरेदी करण्यात आले होते आणि त्याचा ‘टाईम बिफोर ओव्हरहॉल’ संपला होता. म्हणजे इंजिनची मुदत संपलेली होती. तसेच ‘सप्लिमेंटल टाईप सर्टिफिकेट’ची अटही पूर्ण करण्यात आलेली नव्हती, असा आरोप त्यांनी केला. कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग हा सध्या अमेरिकेतील मियामी येथे गेल्याचा दावा करत, त्याला देशाबाहेर कसे जाऊ देण्यात आले? यामुळे गंभीर शंका निर्माण होतात, असे पवार म्हणाले.

ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार?

विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी करत आहे. ब्लॅक बॉक्स डॅमेज झाले तरी त्यातील डेटा रिकव्हर करण्याची क्षमता असलेली लॅब अमेरिकेत आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो, असे मला वाटते. याबाबत मला अधिक माहिती नाही, असे या अपघाताबाबत बोलताना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. सर्व पैलूंनी या अपघाताची चौकशी होत आहे की नाही, याची आम्हालाही माहिती मिळाली पाहिजे, असेही पटेल यांनी सांगितले.

रोहित पवारांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे - कोल्हे

यावर्षीच्या सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत झालेल्या संवादातून या चर्चांना सुरुवात झाली होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दिवशी आम्ही एकत्र प्रवास केला होता. रोहित पवार यांनी आज जे सांगितले, ते काही दिवसांपासून सार्वजनिक चर्चेत आहे. मात्र, चर्चा करून सर्व काही निश्चित करणारी व्यक्ती आता आपल्यात नाही. त्यामुळे ठरलेल्या गोष्टींवर बोलण्यात अर्थ नाही, असा खुलासा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in