

अकोला : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी सातत्याने अजित पवारांच्या मृत्यूवर संशय घेत आहेत. पण यावेळी त्यांनी थेट आत्मघातकी हल्लेखोराचा उल्लेख केल्यामुळे खळबळ माजली आहे.
अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा अजित पवारांच्या निधनाबाबत घातपाताची शंका घेतली आहे. ते म्हणाले, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे पायलट दोनवेळा बदलण्यात आले होते. ते विमान अगोदरच नादुरुस्त होते. त्याच्यावर एक वर्षापासून बंदी होती. त्यानंतरही अजित पवारांना तेच विमान २८ का तारखेला देण्यात आले.
व्हीएसआर कंपनीने गत डिसेंबर महिन्यात आपल्या कंपनीच्या प्रत्येक वैमानिकाचा प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. जर ५० कोटींचा विमा उतरवला गेला असेल आणि जो पायलट ऐनवेळी बदलण्यात आला त्याला हिप्नोटाईज केले होते का? त्याला आमिष दाखवण्यात आले होते का? अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो, असे मिटकरी म्हणाले.
पायलटने 'मे डे'चा कॉल का दिला नाही?
अमोल मिटकरी यांनी आपल्या दाव्याखातर राजीव गांधी यांची हत्या व मुंबईवरील हल्ल्याचाही दाखला दिला. ते म्हणाले, अजमल कसाब यालाही दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळीही असा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाईज करून पाठवले होते का? हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलटने 'मे डे'चा कॉल दिला नाही. ‘टेक ऑफ’ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, पण पायलटने ते केले नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका ‘व्हीएसआर कंपनी’वर आहे.
५० कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करण्यास लावले का? याचाही तपास झाला पाहिजे. याप्रकरणी मी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे मिटकरी म्हणाले.
अजितदादांसोबत 'पीए' का नव्हता? - बजरंग सोनवणे
"नेहमी सावलीसारखे सोबत असणारे अजित पवारांचे पीए त्या दिवशी विमानात का नव्हते? विमानात फक्त सुरक्षा रक्षकच का होते? हे सर्व तर्क-वितर्क सामान्य माणसाच्या मनात येत आहेत," असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणेंनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष
आमदार रोहित पवार अजित पवारांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कुटुंबातील एक सदस्य म्हणून पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पत्र परिषदेकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मला अपेक्षा आहे ते अनेक गोष्टी कव्हर करतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील, ते सादर करतील. त्यामुळेच त्यांची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.