पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अनेक प्रश्न आहेत. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्व समस्यांमधून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम आम्ही करणार आहोत. मी फक्त विकासावर बोलणार आहे. इतरांच्या आरोपांवर बोलणार नाही. कारण त्यापेक्षा शहरातील प्रश्न महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने केलेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नांना बुधवारी बगल दिली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवार म्हणाले, आज आरोग्य, वाहतूक, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, कचऱ्याची दुर्गंधीमध्ये पुण्यातील नागरिक भरडले जात आहेत. त्यामुळे टीकेपेक्षा पुण्यातील नागरिकांना या समस्यांमधून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक अलार्म पाच काम’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ढासळलेल्या व्यवस्थेबाबत ‘अलार्म’ वाजला पाहिजे. पिंपरी-चिंचवडकर आणि पुणेकरांनी त्यांचे जीवनमान एका विशिष्ट उंचीपर्यंत उंचावलेले आहे. आज दोन्ही शहरांतील ढासळलेली प्रशासन व्यवस्था नागरिकांसाठी अडचणी निर्माण करत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे जीवनमान ढासळत आहे, ही बाब ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भागीदार असला, तरी महानगरपालिकेला पुन्हा कार्यक्षम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मेट्रोची मंजुरी डॉ. मनमोहनसिंगांच्या काळातच
मेट्रो डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच मंजूर झाली होती. पण, नंतर भूमिपूजन, प्रदूषण, पाणी वगैरे अशा मूलभूत प्रश्नांमध्ये मेट्रोचे काम अडकले, असेही पवार यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांना फोन करतो
प्रचारात खासदार सुप्रिया सुळे दिसत नाहीत, असे विचारले असता त्यांना मी पत्रकार परिषद झाल्यावर फोन करतो, असे मिश्किल उत्तर पवार यांनी दिले.
प्रचारात येण्यासाठी खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके यांच्याशीही बोलणे झाले आहे. तेही पुढील काळात प्रचारासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिनविरोध काहीजण निवडून आले. त्याबाबत काहींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दबाव होता म्हणून माघार घेतली की खुशीने माघार घेतली, याबाबत तथ्य बाहेर येईल. माझ्या पक्षासह सर्वच पक्षांनी काहीही झाले, तरी उमेदवारी मागे घेणार नाही, अशाच उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुण्यात दोन महापालिका
हडपसरच्या पुढच्या भागात एक महापालिका होऊ शकते. आळंदी-चाकण ही महापालिकाही होऊ शकेल. ठाणे जिह्यात पाच ते सहा महापालिका आहेत. तसेच पुण्यात आणखी दोन महापालिका झाल्या, तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.