कोल्हेंना पाडणारच! अजित पवारांनी थोपटले दंड

कोल्हेंना पाडणारच! अजित पवारांनी थोपटले दंड

खा. कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांनी थेट कोल्हे यांनाच इशारा दिला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काल त्यांनी बारामतीत थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर सोमवारी त्यांनी शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लक्ष्य करत यावेळी आम्ही शिरुरला दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असे सांगत थेट कोल्हेंविरोधात दंड थोपटले. त्यामुळे शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांतच चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत. खा. कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांनी थेट कोल्हे यांनाच इशारा दिला आहे. 

खा. डॉ. कोल्हे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘‘दोन खासदार पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहेत. तसे हे चांगले आहे. परंतु, या दोन खासदारांपैकी एक खासदार साधा मतदारसंघातदेखील फिरत नव्हता. त्यावेळीच त्याने मला राजीनामा देणार, असे सांगितले होते. खरे तर या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटील यांनी प्रयत्न केला. आता यांना चांगलाच उत्साह आला आहे. खरे तर ते एक उत्तम वक्ते आहेत, कलाकार आहेत. ते जनतेची उत्तम सेवा करतील, असे वाटले होते. परंतु, ते मतदारसंघात कधीच फिरकले नाहीत. आता त्यांना आक्रोश मोर्चा, पदयात्रा सूचत आहेत. निवडणुका जवळ आल्याने त्यांना आता हे सूचत आहे. परंतु ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आता त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असे आव्हान देत थेट कोल्हे यांच्या विरोधात दंड थोपटले.

logo
marathi.freepressjournal.in