राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांच्या तसंच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. शनिवारी(७ ऑक्टोबर) अजित पवार हे नाशिक जिल्ह्यााच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, दिंडोरी तालुक्यातील वणी याठिकाणी अजित पवारांच्या ताफ्यावर कांदा आणि टोमॅटो फेकण्यात आल्याने पोलिसांची एकच भंबेरी उडाली. राष्ट्रवादी काँदग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा सोबत घेत शरद पवार यांच्याशी बंडखोरी करत भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अजित पवार यांनी जोरात पक्षबांधणी सुरु केली आहे. शनिवारी सकाळी विमानाने ते ओझर विमानतळावर ुतल्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.
सत्तेत सहभागी होताना सोबत असणाऱ्या आमदारांच्या मतदार संघात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जात असताना वणी परिसरात बिरसा मुंडा चौकात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन कले. शरद पवार गटाचे जिल्ह्याध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत. २० किलोच कॅरेट ६० ते ७० रुपये दराने विकलं जात आहे. दुसऱ्याबाजुला कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावून दर पाडण्यात आले आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितलं.
गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकमध्ये कांदा प्रश्न गाजत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो फेकले जातील याची कल्पाना यंत्रणेला कशी आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज दिवसभरात अजित पवारांचे नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे इतर ठिकाणीही अजित पवारांना शेतकऱ्यांच्या रोषाला समोरं जावं लागण्याची शक्यता आहे.