
मुंबई : २०२५-२६ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवार १० मार्च रोजी विधी मंडळात सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी संत तुकारामांचे नाव घेतले. यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी संत तुकारामासह एकनाथांना बाजूला सारले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. अर्थसंकल्पीय चर्चेत जयंत पाटील बोलत होते.
वित्त मंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा सन २०२५ - २६ चा ४५ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला हा अजित पवार यांचा विक्रम आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याने अर्थसंकल्पातील तरतुदींना कात्री लागणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. आपल्या खात्याला मिळणाऱ्या निधीला कात्री लागू होऊ नये यासाठी मंत्र्यांना अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा सूचक इशारा जयंत पाटील यांनी दिला.
या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी ‘बडा घर आणि पोकळ वासा’ या शब्दात अर्थसंकल्पाचे वर्णन केले.
विधान परिषदेतही यंदाच्या अर्थसंकल्पीय चर्चेत विधान परिषदेतील मविआच्या नेत्यांनी महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, हमी भाव देऊ अशा वारेमाप घोषणा केल्या. परंतु, सोयाबीन, कापूस, कांदा आणि तूरीला प्रत्यक्ष हमी भाव मिळत नाही. सध्या तर शेतकऱ्यांना उत्पन्न किती मिळेल, हेही सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे सरकारने लागू केलेले कापूस आयात धोरण शेतकऱ्यांसाठी मारक आहे. शेतकऱ्यांचे मरण, हेच सरकारचे धोरण असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली.