“मी साठीत भूमिका घेतली, काहींनी 38 व्या वर्षीच वसंतदादांना...”,  नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला

देशापुढे आज नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कणखर नेतृत्व दिसत नाही. आज मी सत्तेत आहे. माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचेही ते म्हणाले.
“मी साठीत भूमिका घेतली, काहींनी 38 व्या वर्षीच वसंतदादांना...”,  नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार वेगळी भूमिका घेत भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची किंवा कोपरखळी मारण्याची एकही संधी सोडली जात नाही. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. माझ्यामागे ४३ विधानसभेतील, दोन अपक्ष आणि विधानसभेतील सहा आमदार उभे आहेत. त्यांना माझी भूमिका पटल्यानेच हे शक्य झाले आहे. मी साठीत भूमिका घेतली काहींनी वयाच्या अडोतिसाव्या वर्षी घेतली होती, असे म्हणत त्यांनी नाव न घेत शरद पवार यांना टोला लगावला आहे. वरिष्ठांनी आता मार्गदर्शन करावे, असे देखील पवार यावेळी म्हणाले.

 बारामती येथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यांना झोकून देऊन काम करायचे आहे त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना दुसऱ्या गटात जायचे आहे त्यांनी खुशाल जा. पण आता कठोर भूमिका घ्यावी लागले,  असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला थेट भिडण्याचे संकेत दिले आहेत.

 ते पुढे म्हणाले, मी पार साठी झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी तर ३८ व्या वर्षी घेतली. वसंतदादा यांना डावलून निर्णय घेतला गेला, म्हणजे यापूर्वी निर्णय घेतले नाहीत, असे नाही. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाचा काळ असतो. वय जास्त झाल्यावर आपण घरातल्यांना म्हणतो तुम्ही आता आराम करा, मार्गदर्शन करा, आशिर्वाद द्या, असे देखील ते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत म्हणाले.

मी जी भूमिका घेईन ती बारामतीकरांच्या हिताची असेल. ज्या दिवशी बारमतीकरांचे हित जोपासले जाणार नाही असे लक्षात येईल, त्यादिवशी अजित पवार निश्चितपणे वेगळी भूमिका घेईल. नवीन भूमिका घेतल्यानंतर आता इकडे मग तिकडे असे पुढील काळात चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले..

नरेंद्र मोदींची स्तुती –

यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. देशापुढे आज नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कणखर नेतृत्व दिसत नाही. आज मी सत्तेत आहे. माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मी याआधी मागे असायचो, वडीलधारी नेत्यांनी सगळे पहावे, अशी भूमिका घ्यायचो. मात्र, ही भूमिका घेतल्यानंतर माझे मोठ्य लोकांशी संबंध यायला लागले आहेत. त्यांना मी जे काम सांगतो ते करतात. मी इथेनॉल आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर दिल्लीला जाऊन त्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज देशपातळीवर अनेक दिग्गज नेते आहेत. पण नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कणखर नेतृत्व दिसत नाही. जागतिक पातळीवर भारताचे नाव मोदींमुळेच झाले आहे. इंडिया आघाडीतील मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आल्याचा उल्लेख करत मोदी व खर्गे यांना उभे केले तर भारतीय नागरिक म्हणून तुम्ही कोणाला निवडून द्याल?  असा सवाल देखील त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in