रविकिरण देशमुख/मुंबई
टोयोटा किर्लोस्कर कंपनीसोबतच्या सामंजस्य कराराचा कार्यक्रम ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे होत असताना चक्क उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांना या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते. यामुळे अस्वस्थ झालेल्या पवार यांना आघाडीच्या धर्माची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करून द्यावी लागली. शिवाय याप्रसंगी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीचे औचित्यही लक्षात आणून द्यावे लागले. त्यानंतर त्यांना तत्काळ तिथे उपस्थित राहण्याचा आग्रह झाल्यानंतर ते कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. यामुळे चक्क उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्रीच उद्योग खात्याच्या कार्यक्रमात ‘बिन बुलाये मेहमान’ ठरल्याची खमंग चर्चा आज दिवसभर रंगली होती. सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच पवार आणि सामंत हे दोघेही त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार मंत्रालयात उद्योग विभागाचा आढावा घेत होते. सोबत रत्नागिरी येथील विविध विकासकामांचा आणि तळेगाव, चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील वाहतूक समस्येचाही आढावा घेतला जात होता. मात्र, यावेळी उद्योग विभाग आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तिथे पाठवले होते.अजित पवार आणि सामंत या दोघांनाही बहुधा या गोष्टीचे वैषम्य वाटले. मला तर निमंत्रण मिळाले नाही, तुम्हालाही बोलावले नाही का, असे पवार यांनी सामंत यांना विचारले. त्यावर सामंत यांच्याकडून नकारार्थी उत्तर आले.
औद्योगिक गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार होत असताना उद्योगमंत्रीसुद्धा तिथे नसावेत, हा प्रकार अजबच असल्याची चर्चा सुरू झाली. कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले आहे आणि त्यासाठी निमंत्रणे देण्याची जबाबदारी कोणाची होती, याची विचारणा झाली. काल मंगळवारीच उद्योग विभागासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. तिथे सर्व मान्यवर होते. तिथेही आपल्याला याबाबत काही सांगितले गेले नाही, अशी या दोघांमध्ये चर्चा झाली. या अस्वस्थतेतून पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी केला, असे सूत्रांनी सांगितले.
आपले सरकार महायुतीचे आहे आणि आघाडी धर्म म्हणून टोयोटासोबतच्या २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावरील स्वाक्षरीचा महत्त्वाचा कार्यक्रम असताना आपल्याला बोलावले गेले नाही, शिवाय उद्योगमंत्री सामंत हे सुद्धा आपल्यासोबत मंत्रालयात आहेत, त्यांनाही निमंत्रण नाही, असे पवार यांनी शिंदे यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले, असे म्हणतात. ‘तुम्ही दोघेही लगेच इथे या, मी तोवर कार्यक्रम थांबवतो, असे शिंदे म्हणाले. तेव्हा पवार आणि सामंत यांनी मंत्रालयात सुरू असलेली बैठक थांबवली आणि लगेच सह्याद्री अतिथीगृहाकडे कूच केले. पवार आणि सामंत यांच्या दैनंदिन कार्यक्रमात टोयोटा किर्लोस्कर कंपनीसोबतच्या करारावरील स्वाक्षरी कार्यक्रमाचा उल्लेखच नव्हता. आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार पवार हे सकाळी साडेदहा ते साडेबारा या कालावधीत तीन बैठका आटोपून नंतर मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाणार होते आणि नंतर नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आगमनप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी विमानतळावर जाणार होते. सामंत हेही अजित पवार यांच्यासमवेतच्या बैठका आटोपून दुपारी २ नंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे इतर बैठकांसाठी जाणार होते.
महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा
या दोघाही मान्यवरांना टोयोटाच्या करारावर स्वाक्षऱ्या होत असताना आपल्या उपस्थितीचे औचित्य पटवून द्यावे लागले आणि ऐनवेळी तिथे पोहोचावे लागले, याची चर्चा मात्र त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चांगलीच रंगली होती. यावरून महायुतीत सर्व काही आलबेल नाही, असे दिसून येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.