मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली तर...

वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आणि त्यातून वाहणाऱ्या नद्या-नाल्यांमुळे शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसामुळे शेतमजूर कामावर जाऊ शकले नाही
मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली तर...
ANI

राज्यामध्ये लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राज्यसरकारला चांगलेच सुनावले आहे. पाऊस सुरु असल्याने शेतकरी एवढे दिवस वाट पाहत होता, पण आता त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. शेतकऱयांची त्वरित दखल घेऊन त्यांना सरकारने लवकर मदत जाहीर करावी असे पवार यांनी सांगितले. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली तर अतिवृष्टीचा अंदाज येईल असेही अजित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले. अजित पवार सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर आणि वर्ध्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. उद्या ते यवतमाळला जाणार आहेत. 

अजित पवार यांनी आज वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी बाधित भागातील शेतकरी व स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आणि त्यातून वाहणाऱ्या नद्या-नाल्यांमुळे शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसामुळे शेतमजूर कामावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. या सर्व परिस्थितीची वस्तुस्थिती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत. त्याचबरोबर हरभरा आणि तुरीचे बियाणे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. विदर्भात अजूनही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in