अजितदादांनी रणशिंग फुंकले; बारामतीत १४ जुलैला जाहीर सभा; सिद्धीविनायकाच्या दर्शनाने प्रचाराचा नारळ फोडला

Ajit Pawar: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी झंझावाती दौरे सुरू करणार असून त्याची सुरुवात प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.
अजितदादांनी रणशिंग फुंकले; बारामतीत १४ जुलैला जाहीर सभा; सिद्धीविनायकाच्या दर्शनाने प्रचाराचा नारळ फोडला
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी झंझावाती दौरे सुरू करणार असून त्याची सुरुवात प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी दिली. दरम्यान, १४ जुलै रोजी बारामती येथे जाहीर सभा होणार असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.

सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर मंगळवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र येत श्री सिद्धीविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले. “जनतेसमोर त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिद्धीविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि मंगळवारी अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, महिला नेत्या सुरेखा ठाकरे, पक्षाचे आमदार, माजी आमदार, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, विश्वस्त सुनील गिरी, आरती साळवी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in