बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार विधानसभा निवडणूक लढवणार?

बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या लढत? अजितदादांविरुद्ध सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवण्याची शक्यता...
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार विधानसभा निवडणूक लढवणार?

बारामती: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या, मात्र खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच झाला होता. या सामन्यात शरद पवारांनी अजित पवारांना मात दिली. आता बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो. बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आज शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.

युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या..

लोकसभा निवडणूकीतील दमदार कामगिरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विधानसभा निवडणूकांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. काल (१० मे) अहमदनगरमध्ये झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षानं ८५ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानंतर शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामतीत दौऱ्यावर आहेत. दरम्यान अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदासंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती आहे. आता कार्यकर्त्यांच्या या मागणीवर शरद पवार नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले होते. 

वर्धापन दिन कार्यक्रमात ८५ विधानसभा जागा जिंकण्याचा निर्धार-

काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अहमदनगरमधील न्यू आर्ट कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांसोबत पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पक्षानं विधानसभा निवडणूका जिंकण्याचा निश्चय केला आहे. विधानसभा निवडणूकीत ८५ जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार पक्षानं केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in