अडथळे दूर न केल्यास ‘टाटा’ला १० कोटींचा दंड; पालखी मार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

मेट्रोशी संबंधित कामे करणाऱ्या टाटा कपंनीने पालखी मार्गावरील काही अडथळे सोमवारपर्यंत दूर करावेत. पालखी शहरात येईपर्यंत हे अडथळे न हटवल्यास ‘टाटा' कंपनीला १० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शनिवारी येथे दिला.
अडथळे दूर न केल्यास ‘टाटा’ला १० कोटींचा दंड; पालखी मार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा
Published on

पुणे : मेट्रोशी संबंधित कामे करणाऱ्या टाटा कपंनीने पालखी मार्गावरील काही अडथळे सोमवारपर्यंत दूर करावेत. पालखी शहरात येईपर्यंत हे अडथळे न हटवल्यास ‘टाटा' कंपनीला १० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शनिवारी येथे दिला. दरम्यान, वारीच्या वाटेवर हद्दींच्या बदलामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी पोलिसी समन्वयातून एक अभिनव उपाय योजण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानभवनातील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पावसाची सद्यस्थिती, आषाढी वारीसाठीची तयारी, नव्याने सुरू झालेले वाहतूक ॲप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना आणि अहमदाबाद येथील विमान अपघातासारख्या राष्ट्रीय घटनांवर त्यांनी विस्तृतपणे भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, की पालखी मार्गावरील काही अडथळे दूर करण्याची जबाबदारी ‘टाटा' कंपनीवर सोपवण्यात आली आहे. सोमवारपर्यंत हे अडथळे दूर झाले नाहीत किंवा पालखी शहरात येईपर्यंत काम पूर्ण झाले नाही, तर 'टाटा' कंपनीला १० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात येईल. पीएमआरडीएचे योगेश मासेना यांना ही नोटीस बजावण्यास सांगण्यात आले आहे.

पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा आणि कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विशेषतः, पिंपरी-चिंचवडची हद्द संपल्यानंतर पुणे शहराची, पुणे शहराची हद्द संपल्यानंतर ग्रामीणची, त्यानंतर सातारा आणि सोलापूर जिह्यांची हद्द लागते. या हद्दींच्या बदलामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी एक अभिनव उपाय योजण्यात आला आहे.

वारकऱ्यांच्या दिंड्यांना मिळणाऱ्या निधीबाबत कुणालाही विसर पडलेला नाही आणि निधीची उपलब्धता वित्त विभागाने केली आहे. तीन, पाच किंवा साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या (कमी क्षमता) शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत दिली आहे. मात्र, साडेसात हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमतेच्या (१०, १५ हॉर्स पॉवर) इलेक्ट्रिक पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत लागू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in