
मुंबई : राज्यात सत्तेचा उपभोग सर्वाधिक मी घेतला असून सत्तेसाठी कधी हापापलेलो नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी अप्रत्यक्ष महायुती व मविआ नेत्यांना काढला. बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती-धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करूया. त्या सर्व घटकांना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामावून घेऊन काम करतो हे वाटले पाहिजे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात केले.
जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील असंख्य शरद पवार गटाच्या पदाधिकार्यां्नी शनिवारी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले. त्याचपध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सुटावे, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी काम करत आलो आहे. राज्यात उभारली जाणारी महापुरूषांची स्मारके भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल अशी कामे सरकार करत आहे असेही अजित पवार म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काम मिळणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षात प्रवेश देत असल्याचे जाहीर करतानाच प्रवेशकर्त्यांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले.
जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समितीमधील शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल पाटील उपस्थित होते.
शरद पवार गटाचा लवकरच मेळावा
शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर हे मेरिटचे नेते होते. ते पक्ष सोडून गेले, त्यांच्यावर पक्षाची कोणतीही नाराजी नाही तसेच त्यांची देखील या पक्षावर नाराजी नसल्याचे सांगत पक्षवाढीसाठी लवकरच मेळावे आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी आमदार रोहित पवार येणार असल्याचे सांगितले.