"काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते", अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता पलटवार

"काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक..."
"काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते", अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील आरोप-प्रत्यारोप काही केल्या थांबताना दिसत नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर कठोर भाषेत टीका केली होती. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही", असे अजित पवार यांनी आव्हाड यांचे नाव न घेता म्हटले आहे.

"काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत", असे अजित पवार म्हणाले. त्यांनी एक्सवर याबाबतची पोस्ट केली आहे.

ते पुढे म्हणाले की, "माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे", असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असे आव्हाड यांनी म्हटले होते.

"आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नाव काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता. असल घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही", असेही आव्हाड म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in