पवार काका-पुतण्यात जुंपली!अजित पवारांचे भावनिक आवाहन, शरद पवारांचे उत्तर

मला भावनिक आवाहन करण्याची गरज नाही. कारण बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्षांपासून ओळखतात.
पवार काका-पुतण्यात जुंपली!अजित पवारांचे भावनिक आवाहन, शरद पवारांचे उत्तर

विशेष प्रतिनिधी/मुंबई : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरात सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या दोन गटांत चांगलीच जुंपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शुक्रवारी भावनिक आवाहन करताना, मला कुटुंबाकडून एकाकी पाडण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा बारामतीची जनता माझ्या सोबत असेल, असे वक्तव्य केले. तसेच सुप्रिया सुळेंच्या संसदरत्नवरूनही टीकास्त्र सोडले. त्याला शरद पवार गटानेदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे शाब्दिक लढाई चांगलीच रंगली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीवर बारकाव्याने लक्ष दिले असून, या मतदारसंघातून बहीण खा. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याच्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीत सातत्याने दौरे करून मीच बारामतीचा सर्वांगीण विकास करू शकतो. त्यामुळे बारामतीकरांनी महायुतीच्या मागे उभे राहा, असे आवाहन करतानाच आगामी निवडणुकीत माझे कुटुंबीयदेखील मला एकाकी पाडू शकतात, त्यावेळी बारामतीकर माझ्यासोबत असतील. असे सांगून बारामतीकरांना भावनिक बनविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर संसदेत भाषण करून संसदरत्न मिळविल्याने लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, तर त्यासाठी लोकांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी मी देईल त्या उमेदवाराला निवडून द्या, असा आग्रह बारामतीकरांना धरला. बारामतीमधील कार्यक्रमात पुन्हा शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केल्याने शरद पवार गट आक्रमक झाला असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. एवढेच नव्हे, तर अजित पवार यांची पात्रता नसताना पक्षात सातत्याने महत्त्वाची पदे दिली गेली. पक्षात त्यांचे काय योगदान आहे, आम्ही रस्त्यावर उतरून, संघर्ष करून मोठे झाले, आजपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याचा एक तरी गुन्हा अजित पवारांवर आहे का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. या मुद्यावरून आज बारामतीत दाखल झालेल्या शरद पवार यांनीही अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

अजित पवारांचा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न : पवार

मला भावनिक आवाहन करण्याची गरज नाही. कारण बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्षांपासून ओळखतात. मात्र, विरोधकांची मागच्या काही दिवसांपासून भूमिका मांडण्याची पद्धत, त्यांची भाषणे पाहिली तर तेच लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु बारामतीकर याची योग्य ती नोंद घेतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर बोलताना त्यांनी लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीबाबतचा निर्णय कायद्याला धरून नाही -शरद पवार

सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पक्ष, चिन्ह परत मिळवू!

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधात निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा अयोग्य आहे. हा निर्णय कायद्याला धरून नाही. या संबंधात आमचा गट पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी शनिवारी जाहीर केले.

निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानून त्यांना पक्षाचे नाव व चिन्ह 'घड्याळ' बहाल करण्याचा निर्णय झाला. ज्यांनी पक्ष काढला त्यांना त्यातून काढून टाकण्यात आले. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. न्यायालयीन व्यवस्थेनुसार हा निर्णय योग्य नव्हता. या मुद्द्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्षाची स्थापना कोणी केली हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

एसीबी आणि ईडीचा वापर

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, आजकाल एसीबी आणि ईडीसारख्या अनेक एजन्सींचा प्रभाव वाढला आहे. ते विरोधकांच्या विरोधात कसे वापरले जात आहेत हे स्पष्टपणे दिसून येते.

मराठा आरक्षणाबद्दल सरकारने समंजस भूमिका घ्यावी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते मनोज जरांगे यांना मोठ्या संख्येने लोक पाठिंबा देत आहेत. ओबीसी प्रवर्ग, मराठा आरक्षण आणि जरांगे या मुद्द्यावर सरकारने समंजस आणि ठोस भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले असून त्याविषयी छेडले असता शरद पवार व सुप्रिया पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.

अजित पवार बाळबोध

संसद हे येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्यांसाठी लोकशाहीचे मंदिर आहे. पंतप्रधानदेखील जेव्हा पहिल्यांदा संसदेत आले, तेव्हा त्यांनी संसदेचे दर्शन घेतले. तेथे देशाचे कायदे केले जातात, धोरणावर चर्चा केली जाते. संसदीय परंपरेचा मोठा इतिहास आहे. पण संसदेचा ज्या पद्धतीने उल्लेख झाला, ते अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार यांचे हे वक्तव्य मला बाळबोधपणाचे वाटले, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in