Video : "मला राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवीये...", अजित पवारांची जनतेला भावनिक साद, पाहा काय म्हणाले?

"माझा दोष फक्त इतकाच की मी..." नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Video : "मला राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवीये...", अजित पवारांची जनतेला भावनिक साद, पाहा काय म्हणाले?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांना स्पर्श केला. राज्याच्या विकासासाठी मला राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवी आहे, अशी भावनिक साद अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घातली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, "नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेलच, राज्याचा असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात 'माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा करण्यात आली, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात दर महा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्य सरकार प्रतिवर्षी ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे."

हे अत्यंत क्रांतिकारी पाऊल-

अजितदादा व्हिडिओत म्हणाले की, "आजवर आपण पाहात आलो आहेत, प्रत्येक कुटुंबातील आई आपल्या खर्चात शक्य तितकी काटकसर करते पण आपल्या मुलांना काही कमी पडू नये, याची काळजी ती घेते. परंतु काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की, आर्थिक अडचणींमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होतं. मात्र मला आता आशा आहे की, माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यातून राज्यातील माता भगिनींची आर्थिक विवंचना निश्चित दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. माझी मनस्वी इच्छा आहे की, राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी. स्वत: च्या पायावर उभी राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपण दैनंदिन गरजांसाठी वडील, भाऊ, नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे मी जेव्हा या योजनेचा विचार करतो, तेव्हा मला ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं अंत्यत क्रांतीकारी पाऊल वाटतं."

अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं-

"आमच्या सरकारने अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं आहे. एवढंच नाही तर माता भगिनीही पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक पाऊलं उचण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात राज्यात २५ हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठीदेखील आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यातील ३० टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना सहाय्य केलं जाणार आहे. महिला पिंक ई रिक्षा चालवण्यासाठी सक्षम बनवलं जाणार आहे. शिवाय शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींनादेखील मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण, तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच दहा हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड दिला जाईल," असं अजितदादा म्हणाले.

वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे-

"महिला, तरूणांच्या बरोबरीनं राज्याच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा जपाण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांसाठी 'मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ' स्थापन करण्यात येणार आहे. पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं, म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे, वारीतील मुख्य दिंड्यांना प्रति दिंडी वीस हजार रुपये देणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेत. राज्यातील वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढच्या पीढीपर्यंत समर्थपणे पुढं नेणं, यासाठी आमचं सरकार बांधील आहे. तुम्ही पाहिलं असेल, अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत, त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातंय," असं अजितदादा म्हणाले.

लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक-

मला फक्त इतकंच सांगायचं आहे, या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक आहे, की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे मी राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलेला नाही, पार्टी बदलेली नाहीये. अगदी पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष आहे, मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आताही जनतेचा आहे. मी जे काही करतो, त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो.

मला शिव्या शाप मिळताहेत...

"राज्याच्या, राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल, याचाच विचार माझ्या डोक्यात सुरु असतो. राज्यातील जनतेचं सर्वांगीण विकासाचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन, त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे. त्यामुळं जे लोकं बजेटच्या नावानं नाकं मुरडत आहेत, त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा. ही तीच लोकं आहेत, ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही. ही तीच लोकं आहेत, ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे. मी अर्थसंकल्पात राज्यातील गोर-गरीब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलीय. त्याबदल्यात मला शिव्या शाप मिळताहेत."

माझा दोष फक्त इतकाच की मी...

"माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. हे सहन होत नाही, म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा शेतकऱ्यांना गेल्यावर्षी ३५० रूपये प्रतिक्विंटल अनुदान दिलं. तर त्याला विरोध का? आम्ही दुध उत्पादकांसाठी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान जाहीर केलं. कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रूपये बोनस जाहीर केला. धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला जातोय. एवढं करूनही हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याची बोंब मारताहेत. त्यात तथ्य नाही. विरोधकांना राज्याच्या विकासाशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचंय. गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी आम्ही ७ हजार ६०० कोटींचा निधी दिला, पण त्यांच्या पोटात दुखायला लागलंय."

भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जपून राहा...

"येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी आमचा एकच मुद्दा आहे. तो म्हणजे विकास. विरोधकांकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फूस लावण्याचा प्रयत्न लावला जाईल. पण तुम्ही अशा घाणेरड्या राजकारणाला अडकू नका. तुमच्या दारात विकासाची गंगा कोण घेऊन आलंय, याचा विचार करा. केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जपून राहा. जे नेते काम करतायत, त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांना निवडून द्या."

राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवीये...

कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल, त्यांनी माहिती करून घ्यावी. या विकासकार्याची सुरुवात कोणी केली. या सर्वांमध्ये तुम्हाला दादाचा वादा बघायला मिळेल. राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच. जो जास्त काम करतो, त्याला जास्तच विरोध होतो. तो सहन करावा लागतो. माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांप्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सर्वांना दिसतंय आणि पुढंही दिसत राहील. या विकासाच्या मॉडेलची पायाभरणी आम्ही करतोय. त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न साकार होईल. या कार्यासाठी मला राज्यातील १३ कोटी जनतेची साथ हवीये."

logo
marathi.freepressjournal.in