मराठा आरक्षणाची झळ अजित पवारांपर्यंत! कारखान्यात येऊ देऊ नका, अन्यथा...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहे
मराठा आरक्षणाची झळ अजित पवारांपर्यंत! कारखान्यात येऊ देऊ नका, अन्यथा...

मराठा आरक्षमाचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसत आहे. यामुळे राज्यातील वातावरण देखील तापलं आहे. अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आरक्षण दिल्याशिवाय गावात पाऊल ठेऊ नका, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केला आहे. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये अशा आशयाचं पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहे. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला येण्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. अजित पवार यांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये. अशा आशयाचं पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिलं आहे. अजित पवार कार्यक्रम स्थळी आल्यास त्यांना कारखान्यात जाऊ दिलं जाणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसंच कोणत्याच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांस बारामतीत फिरु देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आली आहे.

दरम्यान, आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून पाठिंबा वाढताना दिसत आहे. मराठा समाजाने त्यांच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून सर्वपक्षियांना बंदी केली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा आशयाचे फलक चौकाचौकात लावण्यात आले आहेत.

दरम्यान, गावात राजकीय पुढारी आला तर शांततेत माघारी पाठवा, उग्र आंदोलन करु नका. शांततेनं करा. आत्महत्या करुन नका, असंही जरांगे पाटील म्हणाले. सरकार आमच्या वेदना समजेल, अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपाला असून ४१ वा दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

logo
marathi.freepressjournal.in