अजित पवारांचा मुलासाठी पदत्याग?

पुणे जिल्हा बँकेवर पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता
अजित पवारांचा मुलासाठी पदत्याग?

पुणे : उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप व पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी त्यांनी मुलगा पार्थ पवार यांच्यासाठी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर त्यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय होत आहेत.

अजित पवार हे बारामती तालुका ‘अ’ वर्ग मतदार संघातून पुणे जिल्हा बँकेवर गेली ३२ वर्षे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच देशातील नंबर एकची बँक म्हणून पुणे बँकेने नावलौकिक मिळवला. १९९१ साली अजितदादा या बँकेचे संचालक झाले. तेव्हापासून बँकेची उलाढाल ५५८ कोटींवरून २०,७१४ कोटींवर गेली आहे. अजित पवार यांनी नुकतीच दसऱ्यानंतर राज्यभर पक्ष संघटना बांधणीसाठी तसेच जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यभर दौरे करणार असल्याचे जाहीर केले आहे. बंडखोरीनंतर राज्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा मोठा व्याप, त्यातच सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडे पक्षावरील दाव्याच्या असलेल्या सुनावण्या, शिवाय उपमुख्यमंत्रीपदाचा व्याप यामुळे अजितदादांनी बँकेच्या संचालपकदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. अजितदादांनंतर या बँकेची धुरा कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच या पदासाठी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांचे नाव समोर येत आहे.

अजित पवार ३२ वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी कार्यरत होते. १९९१ पासून त्यांनी या बँकेच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. त्यांनी बँकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर १ ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आणि पुण्यातील बँकेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

दोन्ही मुले राजकारणात सक्रीय

अजित पवार सत्तेत येताच त्यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय झाली आहेत. पार्थ पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत अजितदादांचे पाठबळ असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रीय दिसले नाहीत. अजित पवारांचे दुसरे चिंरजीव जय पवारही राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, राष्ट्रवादीत बंड करुन अजितदादा सत्तेत जाताच दादांची ही दोन्ही मुले पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे. पार्थ पवार व जय पवार हे पक्ष कार्यालयांना भेटी देत असून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशातच पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद हे पार्थ पवारांसाठी संधी असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in