
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी पवार कुटुंबीयांमध्ये फूट पाडल्याचा आरोप मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी येथे केला. बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (शप) उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत शरद पवार बोलत होते.
कुटुंबात फूट पाडण्याचे पाप करण्याची शिकवण आपल्याला पालकांनी अथवा भावांनी कधीही दिली नाही, असे शरद पवार यांनी बारामतीजवळच्या कान्हेरी येथे एका सभेत सांगितले. युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन कुटुंबात जी फूट पडली ती ज्येष्ठांनी टाळावयास हवी होती, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावरून अजित पवारांना त्यांनी लक्ष्य केले.
पहाटेची शपथ
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची कामगिरी आपल्यावर फार - पूर्वी जनतेने सोपविली होती. आता आपण मार्गदर्शक असून पक्षाचा कारभार नव्या पिढीकडे सुपूर्द केला आहे. एखाद्याच्या सत्तेच्या लालसेपोटी कोणीही आपल्या सहकाऱ्यांशी प्रतारणा करू नये. दुर्दैवाने आम्ही जेव्हा सत्तेत नव्हतो, तेव्हा आमच्या एका सहकाऱ्याने पहाटेच शपथ घेतली, मात्र ते सरकार चार दिवसही टिकले नाही, असे शरद पवार म्हणाले.
एखाद्याच्या विरोधात जाऊन आपण काहीही केले नाही
आणि भविष्यातही तसे करणार नाही. कोणी कोणतीही भूमिका घेऊ द्या, आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाही, आपले कुटुंब एकत्र कसे राहील याचाच आपण विचार करू. अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हेही आपल्यासमवेतच राहतात, आपण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले तेव्हा घरातील प्रश्न आणि शेतीची काळजी आपल्या कुटुंबीयांनी घेतली, भावंडांमुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकलो, त्यांच्या मुलांसोबत आपण भेदभाव करू शकत नाही, असेही शरद पवार म्हणाले.
भाषेतील बदल
बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जी भाषा वापरली तेथून कालपरवापर्यंत केलेल्या भावनिक भाषणात त्यांच्या भाषेत कसा बदल झाला ते पवार यांनी अधोरेखित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आपण केली, चिन्हही आपलेच होते असे असताना ते दुसऱ्यालाच देण्यात आले, असेही शरद पवार म्हणाले.
अजितदादांची केली नक्कल
युगेंद्र यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार अत्यंत भावूक झाले होते, त्याची शरद पवार यांनी यावेळी नक्कल केली. आपल्या भाषणादरम्यान शरद पवार यांनी रुमालाने डोळे पुसण्याचे ढोंग केले, त्या कृतीवरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
... म्हणून कुटुंब तोडणार का?
उपमुख्यमंत्रीपद चार वेळा उपभोगलेले असतानाही त्याच पदासाठी अजित पवार दुसऱ्या बाजूकडे गेले, केवळ एकदा पद मिळाले नाही म्हणून तुम्ही कुटुंब तोडणार का, असा सवालही शरद पवार यांनी केला. आता आपण कुटुंबात फूट पाडल्याचे म्हटले जात आहे ते ऐकणे हास्यास्पद आहे. पवार कुटुंबामध्ये आपण कधीही तिढा निर्माण केला नाही, प्रत्येकाने आपल्या म्हणण्याला मान दिला, असेही ते म्हणाले.