"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

रोहित पवार पक्ष फुटीची आठवण सांगताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली.
"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार तोफा रविवारी (५ मे ) थंडावल्या आहेत. परंतु, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे दिसून आले. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. या सभेदरम्यान रोहित पवार पक्ष फुटीची आठवण सांगताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली. 'पट्ठ्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलंच', असे म्हणत त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला. यानंतर रोहित पवारांनीही अजित पवारांवर सोशल मीडियावरून निशाणा साधला आहे.

'रोहित पवार एक्सवर (आधीचे ट्वीटर) म्हणाले, "अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा. आणि हो वडलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही." या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांनाही टॅग केले आहे.

रविवारी बारामतीच्या प्रचारसभेत, "जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते-पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो. आम्ही बसलो होत, बोलत होतो, चर्चा करत होतो. साहेब टीव्हीकडे बघत होते, त्यांनी चेहऱ्यावर नाही दाखविले, टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचे उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना. तो आपल्याला घडवायचा आहे. तो घडवित असताना आणि तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे. नवीन पिढीला ताकद त्याची आहे. जोपर्यंत नवीन पिढीही जबाबदारी घेत नाही तर, जबाबदारी घेण्याच्या लेव्हलची होत नाही. तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही. असे शरद पवारांचे शब्द होते", असे रोहित पवारांनी सांगितले. याबद्दल बोलताना रोहित पवार भावनिक झाले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

तर, त्यानंतर अजित पवार यांचीही रविवारी बारामतीमध्ये प्रचारसभा होती. त्यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल करत त्यांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले, आमच्या एका पट्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखविले. मग, मी पण दाखवितो की, मला मत द्या, असे म्हणत अजित पवार यांनी खिश्यातून रुमाल काढून डोळे पुसण्याची नक्कल करून दाखविली. अजित पवार पुढे म्हणाले, अरे काय आहे हे? असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा., तुमचे खणखणीत नाणे दाखवा. हा झाला रडीचा डाव, हे असले नाही चालत. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. काही काही जण ते करणार, अरे यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिले. गळ्या शपथ खोटे बोलत नाही. साहेबांनी सांगितले अजिबात देऊ नको, मी साहेबांचे ऐकले नाही, त्याला तिकीट दिले. त्यानंतर तो बोलला हडपसरला उभे राहायचे आहे. मी म्हटले तुला देणार नाही, चेतनची आम्ही तयारी करतोय, तू कर्जत-जामखेडला जा तिथे आम्ही प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहे, दाखविलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता, अरे तुझ्यापेक्षा किती तरी उन्हाळे आणि पावसाळे बघितले आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in