

पुणे : राज्यावरील दुष्काळाच्या सावटामुळे जानेवारी २०२७ मध्ये होणारे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्यदिव्य न करता साधेपणाने साजरे करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शासनाकडून जाहीर झालेला पाच कोटी रुपयांचा निधी न स्वीकारता लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून हे संमेलन यशस्वी करण्यावर आज होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संमेलन पुढे न ढकलता सामाजिक भान राखून ते साधेपणाने पार पाडण्यावर महामंडळाच्या सदस्यांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे. शंभरावे साहित्य संमेलन हा मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा टप्पा आहे. त्यामुळे हे संमेलन अतिशय दिमाखात, भव्यदिव्य स्वरूपात आणि मोठ्या गाजावाजात साजरे करण्याचा मानस अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तसेच संमेलनाचे आयोजक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा होता. त्यादृष्टीने नियोजनालाही सुरुवात झाली होती. मात्र, राज्यात दुष्काळाचे सावट असताना संमेलन भव्य व्हावे का? हा विचार पुढे आला. दुष्काळाची तीव्रता पाहता कोट्यवधी रुपये खर्च करणे उचित ठरणार नाही, असा सूर साहित्य वर्तुळात उमटला.
भव्यतेपेक्षा साहित्यिक आशय, विचारमंथनाला प्राधान्य
भाषा मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या शासकीय निधीऐवजी साहित्यप्रेमींच्या योगदानातून संमेलन घेण्याची चाचपणी सुरू आहे. या प्रस्तावावर बैठकीत साधक-बाधक चर्चा होऊन दिखाऊ भव्यतेपेक्षा साहित्यिक आशय आणि विचारमंथनाला प्राधान्य देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
डॉ. शरणकुमार लिंबाळे, बाबा भांड यांची नावे चर्चेत
दरम्यान, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार, याकडे संपूर्ण साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे. मात्र सरस्वती सन्मान प्राप्त लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामार्तब होणार असून आता केवळ अनऔपचारिका बाकी असल्याचे सुत्रांनी सांगितले. या बैठकीत शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावरही अंतिम मोहोर उमटणार असून सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर आहे. तर ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबा भांड यांचेही नाव चर्चेत आहे.
असा निवडला जातो संमेलनाध्यक्ष
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया महामंडळाच्या घटनेनुसार पार पडणार आहे. या बैठकीला महामंडळाच्या पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथील चार घटक संस्थांचे प्रत्येकी तीन पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच हैदराबाद, गुलबर्गा, बडोदा, गोवा, छत्तीसगड आणि भोपाळ येथील संलग्न व समाविष्ट संस्थांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय संमेलनाचे विद्यमान अध्यक्षही या प्रक्रियेत सहभागी असतील. अशा एकूण १९ जणांच्या चर्चेतून संमेलनाध्यक्षपदासाठी एका नावावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एकमत न झाल्यास १९ जणांत हात वर करून मतदान होईल. ज्या नावाला बहुमत तो अध्यक्ष होईल.