Akshay Shinde Encounter : दफनासाठी निर्जन जागा शोधा; अक्षय शिंदेप्रकरणी हायकोर्टाचे निर्देश

बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू असून...
Akshay Shinde Encounter : दफनासाठी निर्जन जागा शोधा; अक्षय शिंदेप्रकरणी हायकोर्टाचे निर्देश
Published on

मुंबई : बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू असून, कुटुंबीयांनी जागा निश्चित केल्यास त्या ठिकाणी अक्षय शिंदेला दफन केले जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतली. याची दखल घेत हायकोर्टाने मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे निर्देश पोलिसांना शुक्रवारी दिले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. त्यावर न्यायमूती रेवती माहिते डेरे आणि न्यायमूर्ती एम.एम साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी आरोपीचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात असून तो अद्याप कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. मृतदेह निर्जन स्थळी दफन करण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची शोधाशोध सुरू आहे. अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व स्मशानभूमींनी नकार दिला आहे. पोलिसांनी जागा शोधल्यानंतर व कुटुंबियांकडून जागा निश्चित झाल्यानंतर कुटुंबियांच्या व पोलिसांच्या उपस्थितीत तो दफन केला जाणार आहे. तसेच या विधीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुटुंबियांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने आरोपीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in